चिपळूण-चिपळुणात १२ दिवसात ४३७ प्लास्टिक संकलन

चिपळूण-चिपळुणात १२ दिवसात ४३७ प्लास्टिक संकलन

Published on

80613
-------------

चिपळुणात १२ दिवसात ४३७ प्लास्टिक संकलन
प्लास्टिकमुक्त अभियान प्रभावी : १५ ऑगस्टपर्यंत चालणार उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ः चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी घेतलेला पुढाकार आता शहरातील महिलांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक प्रभावी ठरत आहे. या स्पर्धेत आजपर्यंत १७८ महिलांनी सहभाग नोंदवला असून, केवळ १२ दिवसांत तब्बल ४३७ किलो प्लास्टिक संकलित झाला. हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महिलांच्या या सहभागी वृत्तीमुळे शहरात स्वच्छतेची चळवळ प्रभावी होत असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक ठोस पाऊल पडले आहे.
सह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्यावतीने ‘होम मिनिस्टर’ ही महिलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित केली असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेतील संकल्पना अतिशय अभिनव आहे. महिनाभरात किमान १५ दिवस प्लास्टिक संकलन करणाऱ्या महिलांना विशेष कुपन्स देण्यात येत असून, त्यातून लकी ड्रॉद्वारे एक भाग्यवान महिला ‘सोन्याची नथ’ जिंकेल. याशिवाय १५ ऑगस्टनंतर सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेतून दुसऱ्या एका विजेत्या महिलेला ‘पैठणी’ प्रदान केली जाणार आहे. अशा प्रकारे स्वच्छतेच्या कार्यात महिला सहभागी होत असतानाच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्नही या उपक्रमातून होत आहे.
या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अभिनेता ओंकार भोजने यांची ‘स्वच्छतेचे दूत’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे महिलांना या उपक्रमात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यामुळे या अभियानाला अधिक व्यापक पोहोच मिळाली आहे. सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण उपक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोरपणे केले आहे.
महिलांनी घरातील प्लास्टिक गोळा केल्यानंतर फक्त एक संदेश दिला की, संस्था कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन प्लास्टिक उचलतात, इतका सुटसुटीत आणि प्रभावी हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे महिलांना केवळ बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत नाही तर त्यांना समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचे समाधानही लाभते आहे. त्यांच्या पुढाकारामुळे चिपळूण शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती होत आहे, पर्यावरणविषयक भान निर्माण होत आहे आणि समाजात सकारात्मक ऊर्जा रूजत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची संधी अजूनही महिलांसाठी खुली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com