पालकमंत्रिपद सांभाळण्यात राणे अपयशी
80963
पालकमंत्रिपद सांभाळण्यात राणे अपयशी
सुशांत नाईक ः भाजप जिल्हाध्यक्षांमुळे निष्क्रियता उघड
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३० ः पालकमंत्रिपद सांभाळण्यामध्ये नीतेश राणे हे अपयशी ठरले आहेत. राणे ज्या पक्षात आहेत, त्या भाजपचे जिल्हाध्यक्ष थेट मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवतात आणि शिंदे शिवसेनेला आवर घालण्याची विनंती करतात. ही राणेंची निष्क्रियता आहे, अशी टीका पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे.
श्री. नाईक यांनी म्हटले आहे, ‘पालकमंत्री नीतेश राणे हे जिल्ह्याचा विकास करू शकत नाहीत. विकासकामांसाठीही निधी देऊ शकत नाहीत. हे स्पष्ट झाल्याने अनेक भाजप कार्यकर्ते हे शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप पक्षात धोक्याची घंटा वाजायला लागली आहे. हे पक्षप्रवेश कार्यक्रम थांबवावेत तसेच शिवसेना शिंदे पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना तंबी द्यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. याचा अर्थ हे सर्व वाद सोडविण्यात राणे निष्क्रिय ठरले आहेत.’
नाईक म्हणाले, ‘नीतेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते आहेत. जर भाजपचे कार्यकर्ते फोडून शिवसेना शिंदे पक्षात जात असतील, तर त्याची सर्वप्रथम तक्रार जिल्हाध्यक्षांनी राणेंकडे करायला हवी होती. मात्र, राणे निष्क्रिय असल्याची खात्री झाल्याने सावंत यांना प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी लागली आहे. पालकमंत्री राणे यांनी यापूर्वी अनेकदा विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोटी आश्वासने दिली व फसवून भाजपमध्ये प्रवेश घेतले. मात्र, हे प्रवेश करणारे कार्यकर्तेही असा समजून चुकले की पालकमंत्र्यांच्या हातून विकासाला न्याय मिळू शकत नाही म्हणूनच त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे.’
नाईक म्हणाले, ‘भाजपचे कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत जात असले तरी या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होणार आहे. कारण शिंदे गटाला आपण जुमानत नसल्याचेही पालकमंत्र्यांनी नुकतेच विधान केले आहे. तसेच हे प्रवेश करणारी कार्यकर्ते देखील कुठल्या एका विचारधारेची बांधलेले नसून केवळ ठेकेदारीसाठी हे प्रवेश होत आहेत हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. ठेकेदारांच्या रखडलेल्या कामांची बिले काढून देतो असे सांगून नीतेश राणे यांनी जिल्ह्याभरात ठेकेदारांचे भाजपमध्ये प्रवेश करून घेतले. मात्र, बिले न मिळाल्याने हे ठेकेदार हवालदिल झाले आहेत.’
---
भाजप प्रवेशकर्त्यांचा भ्रमनिरास
नाईक म्हणाले, ‘सिंधुदुर्गात मुळात भाजप हा पक्षच नव्हता. जिल्ह्यात भाजपने स्वतःचा कार्यकर्ताच तयार केला नाही. त्यामुळे राणे आणि त्यांचे समर्थक भाजपमध्ये आल्याने भाजप हा सध्या मोठा पक्ष झाला आहे. शिवाय पालकमंत्री राणे हे कणकवली मतदारसंघात कार्यकर्त्यांना खोटी आश्वासने देऊन त्यांचे भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत आहेत. मात्र, या कार्यकर्त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होणार नाहीत. कारण राज्य शासन दिवाळखोर झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.