रत्नागिरी-तळागाळातील निष्ठावंत अजूनही ठाकरेंशी प्रामाणिक
81011
तळागाळातील निष्ठावंत अजूनही ठाकरेंशी प्रामाणिक
बाळ माने ः आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकवणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : शिवसेनेचा तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ता अजूनही ठाकरेंशी प्रामाणिक आहे. त्यांना पैशाची नाही, तर पाठीवर शाबासकीची थाप हवी आहे. येत्या शंभर दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. इच्छुक कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागा. पक्षातील गद्दार निघून गेले असल्याने आता येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला पुन्हा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहायचे आहे, असे आवाहन शिवसेना उबाठाचे उपनेते बाळ माने यांनी केले.
रत्नागिरीतील जयेश मंगल पार्कमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, युवा जिल्हाप्रमुख रवी डोळस, संतोष हातणकर, संतोष खराडे आदी उपस्थित होते. माने म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सच्च्या कार्यकर्त्यांच्या जीवावर अनेक आव्हाने परतवून लावली आहेत. आगामी काळात शिवसेनेला चांगले दिवस येणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपणच बाजी मारू, यात शंकाच नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी शिवबंधन परिक्रमा या महत्त्वाकांक्षी अभियानाची आखणी केली आहे. या परिक्रमेच्या पूर्वनियोजनासाठी रत्नागिरी येथे एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, ज्यात पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर सखोल चर्चा करण्यात आली. माजी आमदार आणि पक्षाचे उपनेते बाळ माने यांच्या संकल्पनेतून ही शिवबंधन परिक्रमा सुरू होत आहे. या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार केला आहे.
शिवबंधन परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिल्हादौऱ्याची तयारी केली जाणार आहे. कमीत कमी कालावधीत हा दौरा आयोजित करण्याचे नियोजन असून, परिक्रमेनंतर लगेचच संघटनात्मक कामांना गती मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह अधिक वाढेल आणि पक्षाला एक नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.