‘विजयदुर्ग’च्या नव्या दरवाज्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
81029
‘विजयदुर्ग’च्या नव्या दरवाजाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे; प्रभारी सरपंचांकडून निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग मुंबई यांच्याकडून तालुक्यातील किल्ले विजयदुर्गच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात येत असलेल्या लाकडी दरवाजाच्या एकूणच दर्जाबाबत स्थानिक शिवप्रेमी नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या कामाकडे विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी विजयदुर्ग प्रभारी सरपंच रियाज काझी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
किल्ले विजयदुर्गच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला पुरातन लाकडी दरवाजा बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र, बसवण्यात येत असलेल्या दरवाजाचा एकूणच दर्जा आणि त्याचा ऐतिहासिक बाज या संदर्भात स्थानिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या कामाबाबत स्थानिक शिवप्रेमी मंडळी समाधानी नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. लोकभावनेच्या या विषयाकडे ग्रामपंचायतीने आता जिल्हा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या कामाची पहाणी करण्याची मागणी केली आहे.
--------
वापरलेले सागवान निकृष्ट दर्जाचे
विजयदुर्ग ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, मुंबई यांच्याकडून विजयदुर्ग किल्याच्या गोमुख बांधणी प्रवेशाच्या ठिकाणी पुरातन असलेला पण कोलमडून पडलेला भव्य लाकडी दरवाजा बसविण्यात येत आहे. मात्र, दरवाज्यास वापरलेले सागवान लाकूड हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि कोवळे आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या लाकडी दरवाजास अनुसरून नविन दरवाजाचे डिझाईन नाही. पुरातत्व विभागाच्या नियमावलीस अनुसरून या दरवाजाचे काम झाले आहे, असे दिसत नाही. हा विषय अत्यंत संवेदनशील आणि लोकभावनेचा आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागास कळवावे.’