चिपळूण ः वाशिष्ठी नदीत नवदाम्पत्याने घेतली उडी
८१०५८
८१०५९
वाशिष्ठी नदीत नवदांपत्याने घेतली उडी
दांपत्य धुळ्याचे : कौटुंबीक वाद विकोपाला गेल्याचा परिणाम, शोधकार्य सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : शहरातील गांधारेश्वर पुलावरून एका नवदांपत्याने वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. सायंकाळी उशिरापर्यंत एनडीआरएफ पथकामार्फत त्यांचा शोध घेण्यात येत होता; मात्र उशिरापर्यंत या दांपत्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. नीलेश रामदास अहिरे (वय २५), अश्विनी नीलेश अहिरे (२३, मूळ रा. साक्री धुळे, सध्या पाग नाका, चिपळूण) अशी उडी घेतलेल्या दांपत्याची नावे आहेत. बुधवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संशयित दांपत्य मोटारसायकलवरून गांधारेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेथे दर्शन झाल्यानंतर त्यांच्यात वादविवाद सुरू झाला. त्यांचे भांडण विकोपाला गेले. यानंतर दोघेही रेल्वे स्थानकाकडे मोटारसायकलवरून निघाले; मात्र त्यानंतर ते परत वळून गांधारेश्वर पुलावर आले. यावेळी पत्नी अश्विनीने गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतली. पाठोपाठ पती नीलेश याने देखील पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याचे ही घटना पाहणाऱ्या काही नागरिकांनी सांगितले. यावेळी त्याने आपली मोटारसायकल पुलावरच उभी करून ठेवली होती. प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेतली. तोवर पती-पत्नी दोघेही वाशिष्ठीच्या प्रवाहात बुडाले होते. त्यामुळे त्यांना वाचवण्याची कोणालाही संधी मिळाली नाही.
पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. तत्काळ एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) यांना पाचारण केले असून, त्यांचे जवान दोघांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गांधारेश्वर पुलावर त्या दांपत्याची दुचाकी आढळली आहे. या घटनेमुळे गांधारेश्वर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी नियंत्रण मिळवत शोधकार्यासाठी नदीकाठ सील केला. या घटनेची माहिती मिळताच अहिरे कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.
संसार फुलण्याआधीच...
नीलेश व अश्विनी यांचा विवाह मे महिन्यातच झाला होता. त्यांचा संसार फुलण्याआधीच बुडाल्याची चर्चा तेथील नागरिकांमध्ये सुरू होती. नीलेश अहिरे याची चिपळुणात मोबाईल शॉपी होती. ते दोघेही पागनाका येथे राहत होते. नवदांपत्यामध्ये वादाची अशी कोणती ठिणगी पडली आणि हा टोकाचा निर्णय घेतला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
एनडीआरएफला स्पीड बोटीने जाण्यास दीड तास
आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक चिपळुणात तैनात आहे. दोघांनी नदीत उडी घेतल्याची माहिती एनडीआरएफ पथकाला तत्काळ देण्यात आली; मात्र त्या आधी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. एनडीआरएफ पथकास वाशिष्ठी नदीतून स्पीड बोट घेऊन जाण्यास जवळपास दीड तास लागला. शोधकार्यासाठीचे काही आवश्यक साहित्य तेथे नसल्याने पुन्हा ते आणण्यासाठी पथकातील जवान परत गेले होते. शोधमोहिमेस तत्काळ सुरुवात करण्यास एनडीआरएफच्या पथकाला शक्य झाले नसल्याच्या प्रतिक्रिया प्रशासकीय अधिकाऱ्यांमधूनच घटनास्थळी उमटत होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.