आमदार चव्हाणांकडून दडपशाही

आमदार चव्हाणांकडून दडपशाही

Published on

81195

आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून दडपशाही
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन : डॉ. प्रांजल खेवलकरांचा जी-मेल व्हायरल केल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३१ : भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या खासगी आयुष्यात लक्ष घालत आहेत. त्यांनी डॉ. प्रांजल खेवलकर यांचे खासगी जी-मेल अकाउंट मीडियासमोर व्हायरल केले आहे. ही बाब धक्कादायक असून, हा सायबर क्राईम तसेच दडपशाहीचा प्रकार आहे. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला जिल्हाध्यक्षा ॲड. रेवती राणे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पोलिस अधीक्षकांना दिले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ॲड. रेवती राणे, महिला प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, युवती अध्यक्षा सावली पाटकर, ॲड. सायली दुभाषी, अंकिता सरदेसाई, अर्पिता पालव, अर्पिता सावंत आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, देशातील भाजपशासित राज्यांमध्ये विरोधकांकडे किती द्वेषाने पाहिले जाते, याची कल्पना संपूर्ण देशाला आहे. आपल्या महाराष्ट्रातही काही वेगळे घडत नाही; पण आता भाजपने अतिशय खालची पातळी गाठली आहे. भाजपचे आमदार विरोधी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या खासगी आयुष्यात नजर ठेवून आहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक व गंभीर आहे. भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर डॉ. प्रांजल खेवलकर यांचे खासगी जी-मेल अकाउंट व्हायरल केले. ड्राईव्हमधील खासगी गोष्टी बाहेर दाखविल्या. एखाद्या व्यक्तीची परवानगी न घेता त्या व्यक्तीच्या खासगी अकाउंटमध्ये घुसून ते बाहेर प्रसारित करणे, हा सायबर क्राईम तर आहेच, शिवाय दडपशाहीचा नवा फंडा आहे.
आम्ही विरोधी पक्षात काम करणाऱ्या महिला आहोत. आम्ही विचारांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोणत्याही सत्ताधारी पक्षात न जाता निष्ठेने शरद पवार यांच्यासोबत काम करत आहोत. आमदार चव्हाण यांच्या कृतीमुळे आमच्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे यांच्या विरोधात बोलतोय म्हणून हे लोक आमच्याही फोनमध्ये घुसतील, आमचेही खासगी फोटो बाहेर दाखवतील यांचा काहीही नेम नाही. लाडक्या बहिणींना फक्त निवडणुकीपुरता मान असतो, याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आली आहे. त्यामुळे महिलांची भीती दूर व्हावी व त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी समोरची व्यक्ती आमदार असल्याचा कोणताही विचार न करता कोणी सायबर क्राईम करत असेल तर त्यावर गुन्हा दाखल करून एक वेगळा संदेश द्यावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com