एसटी बस बिघडल्यास तत्काळ होणार दुरूस्ती
- rat३१p३५.jpg-
२५N८१२३५
एसटी बस
गणेशोत्सव विशेष-------लोगो
बिघाड झालेल्या एसटीची तात्काळ होणार दुरुस्ती
चिपळूण आगाराकडून पथक तैनात; गणेशोत्सवात चाकरमान्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः गणेशोत्सव काळात चिपळूणमध्ये येणारी एसटीची वाहने बिघडल्यास तत्काळ दुरुस्त करण्यासाठी पथक तैनात केली आहेत, अशी माहिती चिपळूण आगारप्रमुख दीपक चव्हाण यांनी ‘सकाळ’ला दिली. या पथकात दहा कर्मचारी असतील. चाकरमान्यांना जलद सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
गणेशोत्सवात मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातून कोकणात एसटी महामंडळाच्या ५ हजार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाच्या मुंबई विभागासह पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर आदी भागांतील एसटी गाड्या कोकणात धावणार आहेत. त्यातील रत्नागिरीकडे जाणारी बहुतांशी वाहने चिपळूणमधून जाणार आहेत. बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता नीट माहीत नसतो. महामार्गावर काही ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी रस्ता खचण्याचा धोका आहे. केवळ रस्त्याचे चौपदरीकरण झाले म्हणून वाहनचालक वाहने पळवतात त्यानंतर ती नादुरुस्त होतात. अनेकवेळा वाहने खड्ड्यांमध्ये आदळल्यानंतर बंद पडतात. त्यामुळे एसटी महामंडळाला सर्वाधिक चिंता महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची आहे. महामार्गावर एसटी बंद पडल्यानंतर चाकरमान्यांना भरपावसात पर्यायी व्यवस्था होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. रहदारीच्या ठिकाणी गाडी बंद पडली तर चाकरमानी स्वतःहून पर्याय शोधतात; मात्र जंगल परिसरात वाहन बंद पडले तर चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी मंडळाने ठिकठिकाणी दुरुस्ती पथकं नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
चौकट
...अशी सेवा देणार!
नादुरुस्त वाहनांसाठी नेमलेल्या पथकांमार्फत सुरुवातीला आगारात वाहनांची तपासणी केली जाईल. त्यानंतरच वाहने सोडण्यात येतील. प्रवासामध्ये एखाद्या प्रवाशाला त्रास झाला तर त्याला पूर्णपणे सहकार्य करा, अशा सूचनाही दिल्या आहेत. वाहन नादुरुस्त झाल्यास तत्काळ घटनास्थळी पोचून दुरुस्ती करण्यात येणार आहे.
कोट
महामार्गावरील खड्ड्यांमुळे आधीच एसटीला फटका बसला आहे. त्यामुळे गाड्यांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे गणेशोत्सव काळात वेळीच गाडी दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी दुरुस्ती पथकात वीजतंत्री, टायर फिटर, साहाय्यक कारागीर, साहाय्यक यांत्रिक कर्मचारी तसेच चार उपयंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या संदर्भात वाहतूक विभागाकडून सूचनाही प्राप्त झाल्या आहेत. मोठा अपघात झाल्यास क्रेनही तत्काळ उपलब्ध होणार आहे.
- दीपक चव्हाण, चिपळूण आगारप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.