वाटद एमआयडीसीची वाटचाल समर्थनाच्या दिशेने
- rat३१p१.jpg-
२५N८११४६
वाटद येथे प्रकल्प समर्थनार्थ घेण्यात आलेल्या मेळाव्याला उपस्थित ग्रामस्थ.
- rat३१p३.jpg-
२५N८११४८
प्रकल्पाविरोधात काढलेला मोर्चा.
‘सकाळ विशेष’........लोगो
रत्नागिरी तालुक्यात वाटद येथे एमआयडीसी होत असून, तिथे शस्त्र (बंदुका) तयार करण्याचा कारखाना प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला सुरुवातीला स्थानिकांनी मोठा विरोध केला. त्यासाठी मोर्चे काढले; मात्र गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रकल्प उभारण्याच्या कार्यवाहीला वेग आलेला आहे. त्यामुळे विरोधकांची धार कमी करण्यासाठी वाटद येथे समर्थनार्थ मेळावाही घेतला गेला. त्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक शेतकरी, जमिनमालक, व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प करण्याची ग्वाही दिली. तरुणांचे स्थलांतर थांबवणे, गावातच रोजगार आणि येथील कुटुंबांची आर्थिक उन्नती यासाठीच प्रदूषणविरहित प्रकल्प आणत असल्याचा सुतोवाच केला. प्रशासनाकडूनही प्रकल्पामुळे स्थानिकांची गैरसोय होणार नाही, अशी काळजी घेतली जात आहे. त्यामुळे सुरुवातीचा विरोध हळूहळू मावळून तो सकारात्मकतेकडे वळवण्यावर भर दिला जात आहे....
- राजेश शेळके, रत्नागिरी
---
वाटद एमआयडीसीची वाटचाल समर्थनाच्या दिशेने
पाठिंब्याचा माहोल उभा करण्यात यश; भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली असून, त्या एमआयडीसीत संरक्षण विभागाचा सुमारे १० हजार कोटींची गुंतवणूक असणारा प्रकल्प उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे येऊ घातला आहे. या प्रकल्पामुळे हजारो स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी १ हजार एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाटद मिरवणे, निवे, कोळीसरे, कळझोंडी आदी पाच गावांतील जमीन संपादित केली जात आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, नुकतीच हरकतींवर सुनावणी झाली. यामध्येही बहुतांशी गावांनी प्रकल्पाला पाठिंबा दिला. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी देखील याबाबत स्थानिकांचे प्रबोधन केले. उद्योगपती अनिल अंबानी यांचा संरक्षण विभागाचा धीरूभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड हा मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून स्फोटके, दारूगोळा, शस्त्र (बंदुका) तयार केल्या जाणार आहेत.
*प्रकल्पा विरोधात काही गावांचा मोर्चा
वाटद पंचक्रोशीतील काही गावांनी वाटद एमआयडीसीला विरोध केला. काही गावांनी जमीन मोजणीदेखील बंद पाडली होती; परंतु पोलिस संरक्षणात जमीन मोजणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वाटद संघर्ष समिती स्थापन झाल्या. या समित्यांनी वाटद एमआयडीसीविरूद्ध आंदोलन केले. काही दिवसांपूर्वीच या एमआयडीसीविरोधात मोर्चा काढण्यात आला. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे संविधान विश्लेषक वकील असीम सरोदे आले होते. प्रथमेश गवाणकर यांनी पुढाकार घेऊन या एमआयडीसीला विरोध दर्शवला. ही एमआयडीसी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला.
*११४ हरकतींवर सुनावणी पूर्ण
वाटद एमआयडीसीसाठी सुमारे साडेनऊशे हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मोजणी पूर्ण झाली असून, यावर स्थानिकांच्या हरकती मागवण्यात आल्या. यावर ११४ हरकती आल्या होत्या. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्या निकाली काढल्या. पंचक्रोशीपैकी काही ठराविक लोकांचा एमआयडीसीला विरोध असल्याचे स्पष्ट झाले. सुमारे आठवडाभर सुनावणीची प्रक्रिया सुरू होती.
*प्रकल्पाच्या बाजूने शक्तीप्रदर्शन
या प्रकल्पाला पाठिंबा असणाऱ्या स्थानिक शेतकरी, जमीनमालक आणि व्यापाऱ्यांनी वाटदमध्ये येणाऱ्या संरक्षण विभागाच्या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वाटद संघर्ष समितीविरोधात समर्थनार्थ बैठक बोलावली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांना बोलावण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील यांच्या पुढाकारातून हा बैठक घेण्यात आली. शेतकरी, जमिनमालक, व्यापाऱ्यांची प्रबोधन सभा आयोजित केली. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी करून वाटद एमआयडीसीला पाठिंबा असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या विरोधापेक्षा त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी चांगलेच शक्तीप्रदर्शन केले.
*मेळाव्यात सामतांचा भावनेला हात
पाकिस्तानला हरवण्यासाठी लागणारे शस्त्र वाटदमध्ये होणार, याचा अभिमान असायला हवा. रोजगार नसल्याने ४० टक्के घरे बंद आहेत. आपली मुलं आपल्या आई-वडिलांसमोर नोकरी करावीत यासाठीही हा प्रकल्प आणतोय. देशाच्या ज्या सैन्याबद्दल आपल्याला अभिमान आहे त्यांच्यासाठी शस्त्र बनवणारा हा कारखाना आहे. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैन्याच्या हातात जी बंदूक असेल ती वाटद येथील कारखान्यातील असेल, असे सांगत सामंतांनी भावनेला हात घातला.
*एक हजार एकर जमीन का?
वाटद एमआयडीसीसाठी सुमारे एक हजार एकर जमीन संपादित केली जात आहे. प्रकल्प जर ३०० एकरमध्ये होणार आहे तर मग हजार एकर जमीन कशासाठी, असा अनेकांना प्रश्न पडला होता. तो देखील सामंत यांनी दूर केला. १ हजार एकर जमीन का घेतली? कारण, ३०० एकरमध्ये प्रकल्प होणार आहे. उर्वरित बफर झोन हा प्रकल्पाच्या सुरक्षेच्यादृष्टीने असले. ही जमीन एमआयडीसी नाही तर कंपनीच्या पैशाने घेणार आहे, असे स्पष्ट केले.
*स्थलांतरामुळे ४० टक्के चौथरे ओस
वाटद पंचक्रोशीतील अनेक तरुण, सुशिक्षित बेकार रोजगारानिमित्त मुंबई, पुणे आदी ठिकाणी गेले आहेत. त्यांनी शहरांचा रस्ता धरल्यामुळे काही महिने नोकरीच्या ठिकाणी राहिल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना घेऊन जात आहेत. शेती होत नाही, घरे ओस पडू लागली आहेत. फक्त गणपती, शिमग्यापुरतीच घरे उघडत आहेत. तरुणांच्या हाताला याच ठिकाणी रोजगार हवा असेल तर प्रदूषणमुक्त कारखान्यांसाठी स्थानिकांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन प्रकल्प समर्थकांनी केले आहे.
चौकट
दशक्रोशीतील सरपंचांचे पाठिंब्याचे पत्र
वाटद येथील संरक्षण विभागाच्या शस्त्र कारखान्याला पाठिंबा देण्यासाठी दशक्रोशीतील अनेक सरपंचांनी एमआयडीसीला पाठिंबा पत्र दिले असून, समाज संघटनांनीही पाठिंब्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रकल्प आल्यास परिसराचा विकास होणार असल्याची ठाम भूमिका येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कोट
उद्योग आल्याशिवाय विकास शक्य नाही. प्रकल्पांच्या पायाभूत सुविधा उभारताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, प्रशिक्षण संस्था उभारण्यात याव्यात.
- बाळ जोग, ज्येष्ठ व्यावसायिक
कोट...
आता युवकांनी ठरवले आहे. युवापिढीसाठी बदल हवा आहे. या प्रकल्पासाठी सर्व समाजाचा पाठिंबा आहे. येथील शेतकरी आता प्रकल्पासाठी जागा देण्यास तयार आहे.
- अनिकेत सुर्वे, माजी सरपंच, वाटद
कोट...
वाटद एमआयडीसीसंदर्भात आपली अंतिम भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर त्याचा प्रस्ताव शासनाला गेल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना मोबदला येईल. वाटद, कळझोंडी, मिरवणे, गडनरळ, कोळीसरे या पंचक्रोशीतील एक हजार एकर जमीन आपण भूसंपादन करत आहोत.
-वंदना खरमाळे, एमआयडीसी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.