वाडा केळकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना इतिहासाचे धडे
81259
वाडा केळकर हायस्कूलमध्ये
विद्यार्थ्यांना इतिहासाचे धडे
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ ः वाडा (ता. देवगड) येथील अ. कृ. केळकर हायस्कूलमध्ये इतिहासाची माहिती देण्याबरोबरच काही ऐतिहासिक साधनांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. यावेळी काही ऐतिहासिक संदर्भ देत माहिती देण्यात आली. यावेळी मंचावर दुर्गमावळा प्रतिष्ठान व दुर्गरक्षक प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर राणे, प्रसाद पेंडुरकर, स्थानीय समिती अध्यक्ष शांताराम पुजारे, मुख्याध्यापिका स्मिता तेली आदी उपस्थित होते.
श्री. राणे व श्री. पेंडुरकर यांनी विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख करून देताना काही ऐतिहासिक साधने दाखविली. यात तलवार, वाघनखे, कट्यार आदी शस्त्रांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. तसेच विविध किल्ल्यांची माहितीही देण्यात आली. पूर्वीच्या काळात होत असणारा पत्रव्यवहार, त्याची भाषा, विविध नाणी, नोटा आदी विविध वस्तूंचा संग्रहही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. श्री. पुजारे यांनी इतिहासाचे आजच्या काळातील महत्त्व पटवून दिले. तसेच आकाश तांबे यांनी अशा कार्यक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. मुख्याध्यापिका तेली यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भूषण दातार यांनी केले. आभार नीलेश तिर्लोटकर यांनी मानले.
......................
1271
माडखोल व्ही. पी. कॉलेजच्या
प्राध्यापकांची पुस्तके प्रकाशित
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः येथील शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलच्या प्राध्यापकांनी लिहिलेली तीन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. ही पुस्तके बी. फार्म आणि एम. फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. उपप्राचार्य डॉ. संदेश सोमनाचे यांची ‘मेथोडिकल अप्रोच टू नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम’ आणि ‘इसेन्शिअल्स ऑफ डोसेज फॉर्म डिझाईन’ ही दोन पुस्तके प्रशांत बुक पब्लिशर अँड डिस्ट्रीब्यूटर, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केली आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील सहायक प्राध्यापिका मेघा जाधव आणि वर्षा राणे यांचे ''बायोस्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथोडॉलॉजी'' हे पुस्तक कृपा दृष्टी पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. या यशाबद्दल संस्थेचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान, माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन केले. प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील आणि प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे यांनीही त्यांचे कौतुक केले.