विकासकाम करण्यात स्वारस्य नसल्यास, ती रद्द करा
- rat३१p३७.jpg-
२५N८१२७०
रत्नागिरी ः आढावा बैठकीत माहिती घेताना सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव तथा पालक सचिव श्रीमती व्यास. सोबत जिल्हाधिकारी सिंह व अन्य अधिकारीवर्ग.
प्रलंबित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करा
सीमा व्यास ः स्वारस्य नसणारी कामे रद्द करा, जिल्हा परिषदेच्या अखर्चित कामांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : ग्रामपंचायत स्तरावर अपूर्ण, प्रलंबित असणारी विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत. अशा कामात एखाद्याला स्वारस्य नसल्यास तसे शासनाला कळवून ती रद्द करावीत. नावीन्यपूर्ण योजनेमधील कामे ही सृजनात्मक असावीत, अशी सूचना पालक सचिव सीमा व्यास यांनी रत्नागिरीतील बैठकीत केली.
क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी १५० दिवसांच्या आराखड्याबाबत श्रीमती व्यास यांनी नियोजन समिती सभागृहात आज आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अप्पर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती व्यास यांनी सविस्तर आढावा घेतला.
जिल्हा परिषदेच्या अखर्चित अपूर्ण कामांबाबत त्या म्हणाल्या, १५व्या वित्त आयोगामधून प्रलंबित, अपूर्ण असणाऱ्या कामांचा आढावा शासनस्तरावर घेण्यात आला आहे. निधी अखर्चित ठेवू नये. जिल्हा परिषदेने अशी अपूर्ण कामे कोणत्या कारणाने प्रलंबित आहेत त्याचा आढावा घ्यावा. ती प्रथम पूर्ण करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. एखाद्या गावाला त्यामध्ये स्वारस्य नसेल तर ते काम रद्द करण्याबाबत शासनस्तरावर पत्रव्यवहार करावा. नावीन्यपूर्ण योजनेमधून कामे राबवताना ती सृजनात्मक असावीत. जसा की, जिल्हा परिषद शाळेतील मुलांना नासासाठी पाठवणे हा तुमचा खरोखरच नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. कमान बांधणे, बसशेड बांधणे यामध्ये काय नावीन्यपूर्ण उपक्रम आहे? या बाबी शासनस्तरावर ठळक झालेल्या आहेत. त्यामुळे नावीन्यपूर्ण योजना राबवताना विचारपूर्वक, काळजीपूर्वक कामे करावीत. निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रभारी नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी या वेळी संगणकीय सादरीकरण केले.
चौकट
आरोग्य, नेत्रतपासणीचा १६० जणांना लाभ
महसूलदिनाचे औचित्य साधून आज अल्पबचत सभागृहात आरोग्य व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ १६० जणांनी घेऊन आपले आरोग्य आणि नेत्रतपासणी करून घेतली. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.