विकासात्मक कामांवरुन प्रश्नांची सरबत्ती

विकासात्मक कामांवरुन प्रश्नांची सरबत्ती

Published on

swt३१२४.jpg
८१२९३
देवगड नगरपंचायत

विकासात्मक कामांवरुन प्रश्नांची सरबत्ती
देवगड नगरपंचायत सभाः ठेकेदारांना पाठीशी घालू नका, अन्य प्रश्नांवरीही चर्चा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३१ ः विविध विकासात्मक प्रश्‍नांवरून नगरसेवकांनी आजच्या देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. काही कामांच्या एकूणच दर्जाबाबत असमाधानता व्यक्त करीत ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम होऊ नये, शासकीय निधी मनमानीपणे वापरला जावू नये, असे मत मांडले. आवास योजना, मोकाट गुरे, पाण्याचा प्रश्‍न यावरही बरीच चर्चा झाली.
येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात झाली. मंचावर प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, नगरसेवक शरद ठुकरूल आदी उपस्थित होते. नगरपंचायतीकडील विविध विकास योजनेतील मुदत संपून अपूर्ण राहिलेली कामे रद्द करून बयाणा रक्कम व सुरक्षा अनामत जप्त करण्याच्या विषयावरील चर्चेदरम्यान नगरसेवकांनी कामांबाबत असमाधानता व्यक्त केली. काही ठेकेदारांनी अपूर्ण कामे केली असल्यास आणि त्यांना अर्धवट कामाची जादा रक्कम आगावू पोच असल्यास असे ठेकेदार गांभिर्याने उर्वरित काम करणार नाहीत. शिवाय अशी कामे रद्द केल्यास उलट त्यांचाच फायदा होईल याकडे नगरसेवक संतोष तारी यांनी लक्ष वेधले. तर झालेली काही कामे समाधानकारक नसून अपेक्षित विकास साधला जात नसल्याचा मुद्दा नगरसेवक नितीन बांदेकर यांनी उपस्थित करून कामे करण्यास ठेकेदार सक्षम नसल्यास त्यांचे लाड कशाला? असा प्रश्‍न उपस्थित केला. यातून शासनाचा विकास निधी वाया जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आवास योजनेतील कामांबाबतच्या चर्चेतही संबधित ठेकेदाराला पाठीशी घालून तसेच नागरिकांच्या जीविताशी खेळून गृहप्रकल्प नको असेही श्री. बांदेकर यांनी मत नोंदवले. तर यामध्ये सुमारे २४० लाथार्थी आरक्षण रक्कम भरलेले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मंजूर केलेल्या वार्षिक अंदाजपत्रकातील आकडे नंतर बदलले असल्याकडे श्री. बांदेकर यांनी लक्ष वेधून या सुधारित अंदाजपत्रकाला कोणत्या सभेने मंजुरी दिली, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला. पाणी जोडणी विषयावरील चर्चेत ग्राहकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही, यासंदर्भातील उपविधी नसताना कोणतीही कार्यवाही नको असे नगरसेवकांनी सांगितले. तर बदलाचा विषय अजेंठ्यावर ठेवूनच निर्णय घेतले जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरातील मोकाट गुरांचा प्रश्‍न पुन्हा एकदा चर्चिला जावून यामध्ये अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे येत असलेल्या अडचणी मांडण्यात आल्या. गुरे पकडण्यासाठी एजन्सी नेमण्यात यावी, असाही सूर होता. तर शहरातील बगीच्यांसाठी अडकलेले कर्मचारी येथे घेता येतील, असे नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी सुचवले. महावितरणकडून रस्ता खोदाईकरिता प्राप्त झालेल्या रक्कमेच्या खर्चाचे नियोजन करणे तसेच खोदाई करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामास मंजुरी देण्याच्या विषयात यामध्ये एकूण सुमारे १३२८ मीटर लांबीच्या काही पायवाटा आणि डांबरी रस्त्यांचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच हरकती प्राप्त नसलेल्या पायवाटांना मंजुरी देण्याच्या विषयात माहिती देताना, अशा एकूण ६८ पायवाटा होत्या. त्यातील २६ ठिकाणी हरकती नोंदवल्या गेल्या असून उर्वरित ४२ ठिकाणी काहीही हरकती नसल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, आठवडी बाजारादिवशी संबधित ठिकाणची सायंकाळीच स्वच्छता करण्याची सुचना करण्यात आली.

चौकट
कामाचे नियोजन करणार कसे?
गणेश चतुर्थी सणाच्या नियोजनाबाबतच्या चर्चेदरम्यान शहरातील रस्त्याकडेचे रान काढून ठराविक ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, हाच धागा पकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मानधन वेळीच मिळत नाही, कामाचा पर्यवेक्षक कधी दिसत नाही, असे मुद्दे नगरसेवकांनी मांडून यातून कामाचे नियोजन कसे करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com