जीवाप्रमाणे जपलेली माणसे पक्ष सोडल्यानंतर दुःख होणार

जीवाप्रमाणे जपलेली माणसे पक्ष सोडल्यानंतर दुःख होणार

Published on

एकाच्या बदल्यात चार कार्यकर्ते तयार करु
आमदार भास्कर जाधव ः पक्षसोडून गेलेल्यांना पत्राद्वारे इशारा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः माझ्या आमदारकीची अजून चार वर्षे शिल्लक आहेत. याची जाणीव पक्ष सोडणाऱ्यांना नसली तरीही विरोधकांना नक्कीच आहे. एकाने पक्ष सोडला म्हणून काय झाले त्या ऐवजी चार कार्यकर्ते तयार करेन, असा विश्वास गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे दिला. पक्षातील पडझड थांबवण्यासाठी लवकरच मुंबई आणि मतदार संघात जाहीर मेळावे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, जे पक्षातून अन्य पक्षात गेले ते सांगत फिरत आहेत की, आमचा राग आमदार भास्कर जाधवांवर नाही. मतदार संघाचा व आमच्या भागाचा विकास त्यांनीच केला. कोट्यवधींचा निधी जाधव यांनीच आणला, असे पक्ष सोडून गेलेले सांगत आहेत मग पक्ष सोडायचे कारण काय तर आम्हाला सत्तेत जायचे आहे. आम्हाला विकास करून घ्यायचा आहे. त्यांच्या या विधानामुळे मी संभ्रमात आहे. कारण, ज्या विकासासाठी ते अन्य पक्षात गेल्याचे समर्थन करतात याचा अर्थ ते स्वतःशी खोटे बोलून जनतेची फसवणूक करत आहेत. त्यांचा प्रवेश केवळ वैयक्तीक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी आहे.
राजकीय कारकिर्दीबाबत ते म्हणाले, दोनवेळा आलेल्या निसर्गाच्या संकटावेळीही सर्वांच्या पाठी ठाम उभा राहिलो. नुकसान भरपाई मिळवून देण्यासोबतच सर्वांचे जीवन पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्रातील सगळी यंत्रणा गुहागरमध्ये आणली. लोकप्रतिनिधी म्हणून माझे हे कर्तव्य बजावण्यात मी कधी कसूर केली नाही. असे असताना जे पक्ष सोडून गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासाकरिता गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असे सांगत आहेत. माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे. यापूर्वी जे गेले त्यांनी विकासाकरिता किती पैसे आणले आणि कोणता विकास केला, हे जरा तपासून बघा. आता जे गेलेत ते विकासाकरिता किती पैसे आणणार आहेत? नक्की कोणता व कोणाचा विकास करणार आहेत, हेही जरा अनुभवा आणि कसल्याही भूलथापांना बळी पडू नका.

चौकट
सर्वांना सोबत घेऊन काम केले
गुहागरमध्ये मी २००७ पासून काम करायला सुरुवात केली. त्या वेळी कोणत्याही गावात एखादा सरपंचदेखील आपल्या विचाराचा नव्हता. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांशी आपुलकीने वागून विरोधकांच्या धाकदपटशाही, दहशतवाद व खोतीविरोधात लढून खऱ्या अर्थाने विकासाचे खरे रूप गुहागरला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com