''सावंतवाडी''त दोन ठिकाणी उभारणार उंच राष्ट्रध्वज

''सावंतवाडी''त दोन ठिकाणी उभारणार उंच राष्ट्रध्वज

Published on

81324

‘सावंतवाडी’त दोन ठिकाणी उंच राष्ट्रध्वज
संदीप गावडेः शहरासह चौकुळमधील जागेची लवकरच निश्चिती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः भारत देशाच्या राष्ट्रध्वजाप्रती जनतेची भावना सदोदित प्रज्वलित राहण्यासाठी जिल्ह्यात सर्वात उंच असा राष्ट्रध्वज सावंतवाडी तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात दोन ठिकाणी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे युवा नेतृत्व संदीप गावडे यांनी येथे दिली. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा आगळावेगळा संकल्प सोडला असून लवकरच आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून राष्ट्रध्वज सन्मानाने उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
येथील भाजपच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गावडे बोलत होते. त्यांच्यासोबत सावंतवाडी शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, चौकुळ सरपंच गुलाब गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, उल्हास गावडे आदी उपस्थित होते.
श्री. गावडे म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष ही देशहितार्थ प्रेरित संघटना आहे. या संघटनेत काम करत असताना समाजपयोगी कार्यक्रमासाठी संघटनेकडून नेहमी प्रेरणा मिळते. याच प्रेरणेतून दरवर्षी मी माझा वाढदिवस समाजपोयोगी कार्यक्रमाने साजरा करतो. गतवर्षी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील ११ शाळा सोलर सिस्टिमने जोडण्यात आल्या होत्या. यावर्षीही असाच संकल्प मी वाढदिवसाच्या निमित्ताने सोडला असून जनतेची राष्ट्रप्रेमाप्रती असलेली भावना सदोदित प्रज्वलित राहील या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात उंच असे दोन राष्ट्रध्वज उभारण्याचा मानस आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागात असे हे दोन राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहेत. सावंतवाडी शहरातील काही जागा निवडण्यात येणार आहे, त्यासंदर्भात पालिकेकडे मागणी करण्यात येणार आहे. सावंतवाडी शहरातील भाजपची टीम यासंदर्भात चर्चा करून ती जागा निश्चित करणार आहे तर ग्रामीण भागामध्ये चौकुळ या गावी योग्य जागा निवडून तेथे राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. तेथील ज्येष्ठ नागरिक, गावातील प्रमुख मानकरी, भाजपचे कार्यकर्ते या संदर्भात चर्चा करून योग्य ती जागा निवडणार आहेत. त्यानंतर या संदर्भात आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा राष्ट्रध्वज सन्मानाने उभारण्यात येणार आहे.’’
सावंतवाडी शहरामध्ये सैनिकी परंपरा आहे तसेच चौकुळ गावामध्येही सैनिकी परंपरा असल्याने या दोन ठिकाणी हे राष्ट्रध्वज उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्वात उंच असे हे राष्ट्रध्वज असणार आहेत. यामुळे येथील पर्यटनातही भर पडणार असून लवकरात लवकर हे ध्वज उभारण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com