
81356
बहिणींच्या राख्या सैनिकांसाठी ताकद
श्याम चव्हाणः मालवण भंडारी हायस्कूलकडून ३० हजार राख्या
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थिनींनी पाठविलेल्या राख्यांनी सैनिकांचे मनगट अधिक मजबूत होईल. या राखीरुपी प्रेमाची आठवण सैनिक नेहमीच ठेवतील, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी येथे केले.
सीमेवर पहारा देणारे आणि देशाचे रक्षण करणारे सैनिक हे आपले भाऊच असून त्यांच्याप्रति प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी या उपक्रमाचे नववे वर्ष होते. या उपक्रमांतर्गत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल ३० हजार २०० एवढ्या विक्रमी राख्या बनवून देशाच्या विविध सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैन्यातील लष्कर, वायूदल व नौदल अशा तिन्ही दलांच्या सैनिकांना पाठविण्यात आल्या. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी चव्हाण, राजाराम वराडकर, साबाजी करलकर, दशरथ कवटकर, जॉन नरोना, प्राचार्य हणमंत तिवले आदी उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी मान्यवरांना राख्या बांधल्या. प्रा. पवन बांदेकर यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या भारताच्या अंदमान ते सियाचिन ग्लेशियर, भुज, पंजाब, जम्मू काश्मीर, डोकलाम, अरुणाचल प्रदेश अशा विविध लष्करी सीमेवर तसेच मुंबई, कोचीन, कारवार अशा नौदलाच्या तळावर आणि वायूदलाच्या सैनिकांना राख्या पाठविण्यात येतात, सैनिकांकडून राख्या मिळाल्यावर प्रतिसादही मिळतो, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषणा दिल्या. या राख्या पोस्टाद्वारे सैनिकांना पाठविण्यात आल्या. सूत्रसंचालन वैभवी वाक्कर-गोडकर यांनी केले. आभार पूजा कदम यांनी मानले. यावेळी प्रा. गुरुदास दळवी, प्रा. गणेश सावंत, प्रा. स्नेहल पराडकर, प्रा. अजित परुळेकर, प्रा. संगीता पराडकर, प्रा. प्राजक्ता कोरगावकर, प्रविणा शिंदे, भूषण मेतर, सोहम कांबळी, श्रीराज बांदेकर आदी उपस्थित होते.