तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रमाकडे कल
तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रमाकडे कल
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पसंती; कौशल्य विकसित करण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कमी कालावधीत तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी एका चांगला पर्याय असल्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पदविका पास होताच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे झटपट नोकरी मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा तिकडे ओढा वाढलेला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षे व थेट द्वितीय वर्ष प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, संगणक शाखेसह इतर शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा सुरू आहे. जिल्ह्यात रत्नागिरी शहरात एकमेव शासकीय तंत्रनिकेतन संस्था आहे. या संस्थेत एकूण सात अभ्यासक्रम शिकवण्यात येत आहेत. नोकरी हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून डीएड् आणि अकरावी प्रवेश थंडावले असताना तंत्रनिकेतनला दिवस चांगले येत आहेत.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल जनरल, मेकॅनिकल मायनॉरिटी, सिव्हिल जनरल, सिव्हिल मायनॉरिटी, संगणक, इलेक्ट्रिकल, मेकॅट्रॉनिक्स जनरलच्या ६० तर इलेक्ट्रॉनिक्स जनरलच्या ३० व इलेक्ट्रॉनिक्स मायनॉरिटीच्या ३० मिळून एकूण ४८० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहेत. मेकॅनिकल जनरलच्या ४६ जागांसाठी प्रवेश झाले असून, १४ प्रवेश रिक्त आहेत. मेकॅनिकल मायनॉरिटीच्या ५४ जागांसाठी प्रवेश झाले असून, अवघ्या ६ जागा शिल्लक आहेत सिव्हिल जनरलच्या ४८, सिव्हिल मायनॉरिटीच्या ४३, संगणकाच्या ४७, इलेक्ट्रिकल ४५, इलेक्ट्रॉनिक्स जनरलच्या २०, इलेक्ट्रॉनिक्स मायनॉरिटीच्या २५, मेकॅट्रॉनिक्सच्या ५० मिळून एकूण ३७८ जागांवर प्रवेश झाले आहेत. तंत्रनिकेतनमधील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अनेक नामांकित कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध होते. रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात दरवर्षी परिसर मुलाखतीचे आयोजन केले जाते. गेल्या चार वर्षात १२८ विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीद्वारे निवड होऊन त्यांना चांगला रोजगार मिळाला आहे.
चौकट
प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण
शासकीय तंत्रनिकेतनच्या ४८० जागांवर आतापर्यंत ३७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, तिसऱ्या फेरीचे प्रवेश सुरू झाले आहेत. चौथ्या व अंतिम फेरीचे प्रवेश ६ ते ७ ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. त्यामुळे प्रवेशाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.