ओटव फाटा पुलावरील पथदीप आठ महिन्यांपासून बंदावस्थेत
81425
ओटव फाटा पुलावरील पथदीप
आठ महिन्यांपासून बंदावस्थेत
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १ ः मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुलाखालील पथदिवे आठ महिन्यांपासून बंद आहेत. मुख्य म्हणजे या गावचे प्राथमिक आरोग्य केंद्र याच भागात असूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. ही समस्या मार्गी न लावल्यास स्वातंत्र्यदिनीच आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा पुलाखाली पथदिवे लावले होते. डिसेंबरमध्ये नांदगाव ओटव फाटा पुलावर एका शाळेतील सहल बसला अपघात झाला होता. या अपघातात एसटी बस पथदिव्यांना धडकल्याने ते बंद पडले होते. त्या दिवसापासून संबंधित विभागाला वारंवार याबाबत सूचना करूनही त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. सध्या या भागात रात्रीच्यावेळी पूर्णतः अंधार असतो. अंधाराचा फायदा घेत या पुलावर काही गैरकृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य म्हणजे या गावचे प्राथमिक आरोग्य केंद्र याच भागात असूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागाने हे पथदिवे सुरळीत न केल्यास स्वातंत्र्यदिनीच पुलाखाली ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.