
81428
मालवणातील ‘कातकरीं’ना हक्काचा भूखंड
२९ जणांचा समावेशः आमदार निलेश राणे यांच्याकडून विशेष प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील २९ भुमिहीन कातकरी कुटुंबांना प्रधानमंत्री जन मन आवास योजनेतून घर बांधणीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु आहे. दरम्यान, काही कातकरी कुटुंबियांच्या नावे झालेले भूखंड खरेदीखत आमदार राणे यांनी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. तालुक्यातील २९ लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी प्रत्येकी २ लाख रुपये अनुदान प्रधानमंत्री जन मन आवास योजनेतून मिळणार आहे, अशी माहिती पंचायत समिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दिली आहे.
आमदार राणे यांनी कुंभारमाठ येथे कातकरी कुटुंबियांची भेट घेतली. तसेच मालवण पंचायत समिती येथेही वडाचापाट येथील कातकरी कुटुंबियांची भेट घेतली. गटविकास अधिकारी चव्हाण यांच्याकडून योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, शहर प्रमुख दीपक पाटकर, कुंभारमाठ उपसरपंच जीवन भोगावकर, संजय लुडबे, विभागप्रमुख मंदार लुडबे, अरुण तोडणकर, सूरज बिरमोळे, दत्तात्रय नेरकर आदी उपस्थित होते.
कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन नजिक २२ गुंठे शासकीय भूखंड २५ कातकरी कुटुंबियांना प्रधानमंत्री जन मन आवास योजनेसाठी मिळावा यासाठी प्रस्ताव तालुका व प्रांत स्तरावरून जिल्हाधिकारी स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आला. याठिकाणी २५ कुटुंबांना हक्काचे घर उभारून दिले जाणार आहे. त्यासाठी आमदार राणे यांचे विशेष लक्ष दिले आहे. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रकल्प संचालक रवींद्र पाटील यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी चव्हाण यांनी दिली.
वडाचा पाट येथील ४ कातकरी कुटुंबियांना प्रधानमंत्री जन मन आवास योजनेतून घर बांधणीसाठी आमदार राणे यांच्या विशेष प्रयत्नातून भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. नारायण पवार, संग्राम पवार, महेश पवार, नितेश पवार या वडाचापाट येथील ४ कातकरी कुटुंबियांना मोहन गिरगावकर, ललिता घाडी, प्रतिभा घाडीगावकर, दर्शना घाडी, श्रुतिका घाडी, अशोक गिरगावकर यांच्या माध्यमातून हा भूखंड प्राप्त झाला आहे. ४ कातकरी कुटुंबियांच्या नावे केलेले खरेदीखत आमदार राणे यांनी दुय्यम निबंधक प्रवीण हिंदळेकर यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. यासाठी तहसीलदार वर्षा झालटे यांचे सहकार्य लाभले, असे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.