गव्यांचा मुक्तसंचार; ग्रामस्थांमध्ये धास्ती
81429
गव्यांचा मुक्तसंचार; ग्रामस्थांमध्ये धास्ती
कुणकवळे कुपेरी घाटी; बंदोबस्त करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ ः मालवण-कसाल मुख्य मार्गावरील कुणकवळे कुपेरी येथील घाटीत दोन मोठे गवे अचानक रस्त्यावर आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. गव्यांच्या दर्शनामुळे अनेक वाहनचालक गोंधळून गेले आणि घाबरून त्यांनी आपली वाहने थांबवली. रस्त्याच्या मधोमध उभ्या गव्यांमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
प्रत्यक्षदर्शी वाहनचालकांनी गव्यांचे फोटो काढून इतरांना तसेच गावातील लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुणकवळे गावाच्या वस्तीजवळच गुरुवारी (ता.३१) सायंकाळी ५.५० वाजण्याच्या दरम्यान हे गवे दिसल्याने गावातील रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी केली आहे. ही घटना घडली तेव्हा एकाच वेळी अनेक वाहने या मार्गावरून येत होती. अचानक समोर आलेले विशाल गवे पाहून वाहनचालकांना आपली वाहने थांबवावी लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झाला नाही. मात्र, यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा कोणताही धोका निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गव्यांचा वावर हा मानवी वस्तीजवळ वाढल्यास शेतीचे नुकसान आणि मानवी सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने या गव्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.