आयटीआयमध्ये दोन पदांसाठी आवाहन
आयटीआयमध्ये
दोन पदांसाठी आवाहन
रत्नागिरी ः शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे पीपीपीअंतर्गत असणाऱ्या आयएमसीमार्फत नव्याने चालू करावयाच्या सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) व्यवसायासाठी कंत्राटी निदेशक ही दोन पदे ठोक मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत. पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर रामपेठ, सप्तेश्वर रोड, संगमेश्वर यांच्याकडे आवश्यक कागदपत्रासह ७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे. ८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता अर्ज सादर करणाऱ्यांच्या मुलाखती व व्यावसायिक चाचणी होतील व उमेदवारांची निवड करण्यात येईल. ही पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहेत.
-------
कारगिल विजय दिवस
आयटीआयमध्ये साजरा
रत्नागिरीः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सैनिक रवीराज देवरे, माजी सैनिक अनुराजा पाटील, माजी सैनिक समीर शेख, माजी सैनिक शंकरराव मिलके, माजी सैनिक संतोष कांबळे, माजी सैनिक अरूण कांबळे, वीर पत्नी श्रीमती ऋतुजा महेश चिंगरे यांनी त्यांच्या सैनिकी जीवनातील अनुभव व शिस्त, देशातील सिमांच्या संरक्षणाचे महत्व, माजी सैनिकांना समाजामध्ये येणारे अनुभव याबाबत संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना माहिती दिली. शिल्प निदेशक स्वप्ना धायगुडे यांनी भारतीय इतिहासातील वीरांचा इतिहास कथन केला.
----
‘सैनिक कल्याण’चा
जिल्ह्यामध्ये दौरा
रत्नागिरीः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यात माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/वीर नारी/वीर माता/वीर पिता यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कल्याण संघटक ऑगस्ट महिन्यात दौऱ्यावर येणार आहेत. ४, ११, १८ आणि २५ ऑगस्टला खेड सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे कल्याण संघटक सुनील कदम, ७ आणि २२ ऑगस्टला चिपळूण सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे कल्याण संघटक राहुल काटे, १४ आणि २९ ऑगस्टला कल्याण संघटक अनिल मोरबाळे आजी/माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये अभिलेख कार्यालयविषयक, पेन्शनविषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडवण्यात येतील. मेळाव्यात येताना डिस्चार्ज पुस्तक, पीपीओची प्रत, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, इसीएचएस कार्ड व आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर आदी कागदपत्रे सोबत आणावीत.
-------