संगमेश्वर-उत्तरप्रदेशातील ढोलकीचा संगमेश्वरात आवाज

संगमेश्वर-उत्तरप्रदेशातील ढोलकीचा संगमेश्वरात आवाज

Published on

81403

उत्तरप्रदेशातील ढोलकीचा संगमेश्वरात आवाज
गणेशोत्सवात मागणी; गावोगावी विक्रीसाठी फिरती
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ः आजच्या युगात पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याची संख्या रोडावू लागली आहे; मात्र आजही अशी काही कुटुंबे आहेत की, जी पारंपरिक व्यवसायावरच अवलंबून राहत कौटुंबिक उदरनिर्वाहाचा गाडा चालवतात; मात्र पारंपरिक व्यवसायासाठी त्यांना देशभरात भटकंती करावी लागते. ढोलकी बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करणारी उत्तरप्रदेश आणि राजस्थानमधील काही लोकं गणेशोत्सव आणि श्रावणातील इतर सणांच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर शहरी भागासह तालुक्यातील गाववाडीपर्यंत ढोलकी विक्रीसाठी फिरत आहेत.
ढोलक बनवणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या वेळी आरती म्हणण्यासाठी घरोघरी ढोलकी हे वाद्य वापरले जाते. त्यामुळे या दिवसात ढोलकीला जास्त मागणी असते म्हणून या काळात ते महाराष्ट्रामध्ये आपला व्यवसाय करतात. ढोलकीची किंमत पाहिल्यास अगदी दोनशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत असल्याचे अक्रम शेख या ढोलकी व्यावसायिकाने सांगितले. या ढोलकीचे अनेक प्रकारही आहेत. पुठ्ठा आणि लाकडी पुठ्ठ्यापासून या ढोलक्या तयार केल्या जातात; मात्र महाराष्ट्रात लाकडी पुठठ्याच्या ढोलकीलाच जास्त पसंती आहे तसेच या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला चरितार्थ चालत असल्याचेही त्याने सांगितले.
गणेशोत्सवानंतर लगेच नवरात्र सुरू होते. त्यामुळे या काळात ते महाराष्ट्राला पसंती देतात. या सणानंतर ते गोवा आणि पुढील राज्यासाठी प्रयाण करतात. प्रत्येक राज्यातील सणांची त्यांना अगदी बिनचूक माहिती असते. कोणत्या राज्यात कोणता सण कोणत्यावेळी आहे व त्या वेळी आपल्या ढोलकीला मागणी असेल, याचे गणित त्यांच्या डोक्यात अगदी पक्के आहे. पारंपरिक व्यवसाय करताना या व्यावसायिकांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या व्यावसायिकांचे वास्तव्य कोणत्याही एका शहरात नसल्यामुळे मुलांना शाळेचे तोंडही पाहावयास मिळत नाही. त्यांची मुले लहानपणापासून ढोलकी बनवण्याचे प्रशिक्षण घेतात व लहानपणीच ते उत्तम ढोलकी बनवतात; मात्र हे करत असताना जगासोबत चालण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणापासून ते वंचित राहत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे.

कोट
महागाईच्या काळात सर्वसामान्यांना जगणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे भटकंती करून व्यवसाय करणाऱ्यांनाही या महागाईचा फटका बसत असल्याचेही या व्यावसायिकानी सांगितले; पण पोट भरण्यासाठी दुसरे साधन नसल्यामुळे आम्ही हा पारंपरिक व्यवसाय करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
- अक्रम शेख, ढोलकी विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com