कुडाळ नगरपंचायतीला १ कोटींचा निधी वितरीत

कुडाळ नगरपंचायतीला १ कोटींचा निधी वितरीत

Published on

81474
नीलेश राणे
81475
प्राजक्ता बांदेकर


कुडाळ नगरपंचायतीला
विकासासाठी १ कोटी

प्रलंबित कामे मार्गी लागणार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः येथील नगरपंचायतीच्या विकासकामांसाठी मंजूर झालेला मात्र शासन दरबारी अडकलेल्या प्रलंबित निधी पैकी १ कोटी १० लाख एवढा निधी तात्काळ वितरित केला आहे. यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी पाठपुरावा केला. दरम्यान, यामुळे गेली दोन वर्षे ठप्प विकासकामांना गती मिळणार असल्याचा विश्वास सौ. बांदेकर यांनी व्यक्त केला.
सौ. बांदेकर म्हणाल्या, ‘‘येथील नगरपंचायतीला २०२१- २२ मध्ये नगरविकास विभागाकडून नवीन नगरपंचायतींना सहाय्य अनुदान अंतर्गत चार कामांना २ कोटी तसेच पाच कामांना २.०५ कोटी असा निधी मंजूर झाला होता. मागील तीन वर्षांत प्रत्येकी ९.५० लाख व १८.५० लाख असे एकूण २८ लाख रुपये शासनाकडून वितरण झाले होते. उर्वरित निधी मंजूर असूनही वितरित केला नव्हता. नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर याचा आढावा घेतला आणि आमदार राणे यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. यासाठी आमदार राणे यांच्याकडे १७ फेब्रुवारीला पत्र सादर केले होते. या पाठपुराव्याला आता यश आले आहे. राणे यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रलंबित असलेला १ कोटी १० लाख एवढा निधी नगरविकास मंत्रालयाकडून कुडाळ नगरपंचायतीला वितरित केला आहे. उर्वरित निधी मागणी प्रस्तावही शासनाकडे सादर केला जाणार आहे. या निधीतून प्रामुख्याने भंगसाळ येथील गणेश घाट सुशोभीकरण, जिजामाता चौक ते पोलिस स्टेशन पर्यंत मुख्य गटार व दिवाबत्ती व अन्य विकासकामे पूर्णत्वास येणार आहेत. एकंदरीत मागील दोन वर्षे ठप्प असलेल्या विकासकामाला गती मिळणार असून कुडाळ नगरपंचायतीची महत्त्वाची विकासकामे मार्गी लागणार आहेत.’’

Marathi News Esakal
www.esakal.com