
तळेरे येथे आज
बक्षीस वितरण
तळेरे ः येथील पत्रकार संघ आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर रंगभरण स्पर्धा-२०२५चा निकाल जाहीर झाला आहे. याचा बक्षीस वितरण समारंभ उद्या (ता.२) सकाळी ९.३० वाजता येथील वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह तसेच सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही सन्मान पत्र देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनी, सहभागी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी या समारंभाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुधवडकर, सचिव संजय खानविलकर व खजिनदार निकेत पावसकर यांनी केले आहे.
------
आचरा येथे ६ ला
नारळ लढविणे स्पर्धा
आचरा ः आचरा तिठा येथे ठाकरे शिवसेनेतर्फे बुधवारी (ता.६) दुपारी तीन वाजता नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी प्रथम क्रमांक ५ हजार व आकर्षक चषक, द्वितीय ३ हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या ७० स्पर्धकांना यात सहभाग घेता येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आचरा रिक्षा संघटना अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच आचरा पोलिस स्टेशन होमगार्ड कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी रूपम टेमकर, माणिक राणे, लिलेश मांजरेकर, विद्यानंद परब, सचिन रेडकर, प्रसाद टोपले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आचरा विभाग संघटक मंगेश टेमकर, पप्पू परुळेकर यांनी केले आहे.
---------------
सावंतवाडी स्थानकातील
काम जलद गतीने करा
सावंतवाडी ः येथील बसस्थानक परिसरात पडलेले खड्डे प्रवाशी व एसटी चालकांसाठी गैरसोयीचे ठरत होते. एसटी महामंडळाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. गणेशोत्सव कालावधीत येणाऱ्या जादा गाड्या व चाकरमानी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने बस थांबा परिसरात पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, अद्याप कामाला हवी तशी गती मिळत नसल्याने बसस्थानकावरील समस्या तशाच आहेत. हे काम गतीने करावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
----------------
शिरोड्यात उद्यापासून
अखंड हरिनाम सप्ताह
आरोंदा ः शिरोडा येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम (वीणा सप्ताह) २ ते ९ ऑगस्ट या कालावधीत होत आहे. ८ ऑगस्टला रात्री वारकरी दिंडी (दिंडीरथ) परबवाडीतील देव रामपुरुष मंदिरकडून वाजतगाजत देवी माऊली मंदिरकडे येईल. ९ ला सायंकाळी पालखी मिरवणूक झाल्यावर दहीकाला होईल. त्यानंतर प्रसादवाटप होऊन या वार्षिक उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
पिंगुळीत उद्या
‘नामस्मरण’
कुडाळ ः प. पू. सदगुरू श्री राऊळ महाराज समाधी मंदिर, पिंगुळी येथे रविवारी (ता.३) सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत १२ तास अखंड नामस्मरणाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.