सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकात संघर्ष समितीचे आंदोलन

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकात संघर्ष समितीचे आंदोलन

Published on

81522

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकात संघर्ष समितीचे आंदोलन

विविध मागण्या; दखल न घेतल्यास तीव्रतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ ः कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या सर्व लांब पल्याच्या जलद गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा मिळावा, तिकीट आरक्षण सुविधा तात्काळ सुरू करा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. रेल्वे प्रशासनाला या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करून जिल्हाभर रेल्वेरोको आंदोलन होईल, असा सूचक इशारा यावेळी संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी दिला.
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरा या सर्व दहा रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात आणि जिल्ह्यामध्ये न थांबणाऱ्या सर्व जलद गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकासह विविध रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी थांबा मिळावा, अशी मागणी मागील तीन वर्षापासून संघटनेमार्फत करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्याशी अनेकवेळा संवाद साधण्यात आला, पत्रव्यवहार करण्यात आला तरीही अद्याप संघटनेच्या मागणीनुसार जलद गाड्याना थांबा देण्यात आलेला नाही तसेच अन्य विविध मागण्यांबाबत अद्याप ठोस असा निर्णय झालेला नाही. काही अपवाद वगळता रेल्वेस्थानकांची साफसफाई, पाण्याची सुविधा, बैठक व्यवस्था अशी कामे गेल्या काही दिवसांत केली आहेत. मात्र, प्रमुख मागणी असलेल्या जलद गाड्यांना थांबा व तिकीट आरक्षण सुविधा या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत रेल्वे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकित चर्चा झाली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सर्व रेल्वे स्थानकांची पाहणी केली. समस्या जानून घेतल्या. मात्र, अद्याप त्या सुटल्या नाहीत किंवा जलद गाड्याना थांबा देण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. यासाठी आज रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे जन आंदोलन करू. यावेळी रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर यांच्यासह पदाधिकारी परशुराम परब, नागेश ओरोस्कर, शुभम परब, नंदन वेंगुर्लेकर, राजन परब आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी विविध पदाधिकारी व मान्यवरांनी आपले विचार मांडताना शासन आणि रेल्वे प्रशासन जिल्ह्यातील प्रवाशांवर अन्याय करीत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. दुर्लक्ष होणार असेल आणि या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करून जिल्हाभर रेल्वेरोको आंदोलन होईल, असा सूचक इशारा यावेळी संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.
---------------
संयमी वृत्तीचा अंत पाहू नये
सिंधुदुर्गातील जनता शांत आणि संयमी आहे. त्यामुळे आपल्या समस्या समंजस्याने व संयमाने सोडविण्यासाठी प्रयत्न करते, ही तर आंदोलनाची सुरुवात आहे. मात्र, शांततेने प्रश्न सुटणारच नसतील तर आक्रमक होण्याचीही तयारी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि शासनाने सिंधुदुर्गतील जनतेच्या संयमी वृत्तीचा अंत पाहू नये, असे रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती, सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी यावेळी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com