प्रशासनाविरोधात शुक्रवारी
‘बँड बाजा बारात’ आंदोलन

प्रशासनाविरोधात शुक्रवारी ‘बँड बाजा बारात’ आंदोलन

Published on

81530

प्रशासनाविरोधात शुक्रवारी
‘बँड बाजा बारात’ आंदोलन

सावंतवाडीत डिसोजांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः तालुका व शहरातील रस्ते, आरोग्य आणि इतर विकासकामांकडे सत्ताधारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ठाकरे यांच्या शिवसेनेने शुक्रवारी (ता.८) ‘बँड बाजा बारात’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची सुरुवात सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरून केली जाणार आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी दिली.
श्री. डिसोजा यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. शब्बीर मणीयार, शैलेश गवंडळकर, शहर संघटक निशांत तोरसकर, अशोक धुरी आदी उपस्थित होते. डिसोजा म्हणाले, ‘‘सध्या राज्यात आणि स्थानिक पातळीवर सत्तेत असलेले भाजप आणि शिंदे गट एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना सामान्य लोकांच्या प्रश्नांची आणि विकासकामांची कोणतीही चिंता नाही. पाच वर्षांहून अधिक काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे प्रशासकांकडे कोणाचेही लक्ष नाही. या निष्क्रियतेमुळे आरोग्य सुविधा, रस्त्यांची दुरवस्था आणि इतर विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी ठाकरे शिवसेनेने ‘बँड बाजा बारात’ हे अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ८ ला बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरून आंदोलनाला सुरुवात होईल. त्यानंतर तहसीलदार आणि पंचायत समितीच्या कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला जाईल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘१४३ वर्षांपूर्वीची कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे परिसरातील रस्ता बंद झाला असून नागरिकांना त्रास होत आहे. याकडे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी आधीच लक्ष वेधले होते. मात्र, बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळली तसेच कोलगाव ते बुर्डी पूल रस्त्यावरील नादुरुस्त मोऱ्यांमुळे अपघात होत आहेत. मात्र, त्यांची दुरुस्ती केली जात नाही. या सर्व प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. या प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास ठाकरे शिवसेना अधिक तीव्र आंदोलन करेल.’’

Marathi News Esakal
www.esakal.com