-सदर

-सदर
Published on

गावच्या मालका .........लोगो
(२० जुलै पान ६)
कोकणात विषेशत: रत्नागिरीत शेती म्हणजे भातशेती असायची. हल्ली फुकट रेशनमुळे तीही लवकरच संपुष्टात येईल. कवळ तोडणी, भाजावळ, पेरणी, लावणी, झोडणी, मळणी या पारंपरिक गोष्टी हळूहळू लुप्त होत आहेत. त्याबरोबर आनंदासाठी, श्रम जाणवू नयेत म्हणून गाणारी गाणीही नवीन पिढीला माहिती नसतील. आता शेतीच कमी झाल्याने हा आनंद घेता येत नाही. नवीन पिढीला तर हा इव्हेंट माहिती असण्याचे काही कारण नाही.

-rat२p२१.jpg-
25N81688
--अप्पा पाध्ये गोळवलकर
----
मळणी ही एक संस्कृती होती
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये राबासाठी सुकलेले गवत कापून ठेवायचे. मग गावकुटी झाली की, साग, ऐन, किंजळ या झाडांचे कवळ तोडायचे. गावकुटी म्हणजे ग्रामदेवाचे राउळात कौल घेऊन देवाच्या शेतासाठी कवळ तोडणे म्हणजेच कवळ तोडणीचा प्रारंभ. ते झाले की, शिमगा येतो. शिमगा सण गुढीपाडव्याला संपतो अन् मग जे तोडलेले कवळ आहे ते भारे बांधून भाजावळीसाठी (मशागत) शेतात नेण्याची लगबग सुरू होते. हे केवळ उचलताना त्यात विंचू, फुरसे असण्याची शक्यता असते अन् गावात दोन-चारजणांना तरी या हंगामात विंचू किंवा फुरसे डसतातच. मग सुरू होते भाजावळ प्रक्रिया. पहिल्यांदा ज्या ठिकाणी दाढ (रोपवाटिका) पेरायची असते तिथे गोवरी पसरली जाते. त्यावर कवळाचा जाड थर पसरवतात त्यावर पेंढा, गवत पसरवतात अन् हे झाले की, पहाटे त्याच शेतातील माती वस्त्रगाळ करून या फूट-दीड फूट राबावर पसरवतात. यास माती लावणे म्हणतात हे झाले की, एक-दोन दिवसांनी हे सारं सुकल्यावर वाऱ्याची दिशा बघून आग लावली जाते. मग आठ दिसांनी अर्धवट जळालेले अवशेष गोळा करून परत जाळतात, याला साकुळ काढणे म्हणतात.
यथावकाश रोहिणी नक्षत्रात या भाजलेल्या जमिनीवर भाताची पेरणी होते. पुढे महिन्या-सव्वा महिन्यांनी लावणी होते. नंतर ऑक्टोबरात भातकापणी होते. ते सुकवून त्याच्या पेंढ्या बांधून अडवी/उडवी घातली जाते अन् आवश्यकतेनुसार मग मळणी केले जाते. मळणी साधारणत: रात्रीच करतात कारण, दिवसा खूप ऊन असते अन् भात झोडताना त्याची खाज अंगाची लाहीलाही करते. संध्याकाळपासूनच मळणीची तयारी सुरू होते. गुळगुळीत खळे सकाळीच सारवून घेतलेले असते. त्या सारवणावर छान करा म्हणजे रांगोळी काढलेली असते. सुवाऱ्यासाठी लाकडी बाकडे आणतात. मांडी मारण्यासाठी मधोमध एक नारळ ठेवला जातो अन् मग मोठ्याने नारा दिल्या जातात, ‘हमलोद’, ‘बरकत’ अन् एकेक पेंढी झोडायला सुरुवात होते. मांडीवर झोडलेली पेंढीतील चिवट दाणे झोडण्यासाठी दुसरी टोळी सज्ज होते अन् ती पेंढी बाकड्यावर बडवल्या जाते, याला सुवारा म्हणतात. मग श्रम विसरण्यासाठी एखादा गाणं सुरू करतो अन् बाकीचे सवंगडी त्याच्या मागून एकसुरात म्हणू लागतात अन् मस्त माहोल बनू लागतो. ही गाणीही पारंपरिक असतात. उदाहरणार्थ-
अगो मेवन्ये गो दे माझं बेंडबावलं जी
अवो सान्यात ठेवलंय
मला नाय गावलंय
अग मेवन्ये ग दे माजं बेंडबावलं जी
अशी अनेक गाणी आहेत, ती उच्चारवात म्हटली जायची मळणी संपेपावेतो. मळणी संपली की, आंघोळी, जेवण करून लोक घरी जात. दुसऱ्या दिवशी भात वारवणी/पाखडणी होई अन् भात मोजणी सुरू होई. पायलीने भात मोजायचे; मात्र मोजणारा डोक्यावर टोपी नाहीतर मुंडासे बांधूनच मोजणी करी. एक पायली झाली की, मोजताना एक न म्हणता लाभ असे म्हटले जाई. यथावकाश ते भात कणग्या, हडपे, कोळी यात साठवले जात असे; मात्र त्या भाताला किडमुंगी लागू नये म्हणून त्यात चिरफळे (त्रिफळे) मिसळून ठेवत. आता मात्र शेतीच कमी झाल्याने हा आनंद घेता येत नाही. नवीन पिढीला तर हा इव्हेंट माहिती असण्याचे काही कारण नाही. असो कालाय तस्मै....

(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com