बांदा तपासणी नाका पुन्हा वादात

बांदा तपासणी नाका पुन्हा वादात

Published on

81700

बांदा तपासणी नाका पुन्हा वादात

उपकंत्राटदाराचा जागेवर दावा; संभाव्य वाहन तपासणीला विरोध

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ ः महाराष्ट्र-गोवा सीमेवरील येथील तपासणी नाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उपकंत्राटदाराने सुवर्ण बिल्डकॉन पुणे यांना ८० कोटी रुपयांची थकबाकी न मिळाल्याने त्यांनी या जागेवर हक्क सांगितला आहे. या परिस्थितीत गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहने चेकपोस्टवर थांबविण्याच्या रत्नागिरी वाहतूक पोलिसांच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
​न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जोपर्यंत सुवर्ण बिल्डकॉन कंपनीला त्यांची थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत ही जागा त्यांच्या ताब्यात राहणार आहे. ही थकबाकी अद्याप मिळालेली नाही, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे या जागेचा कोणताही वापर करताना न्यायालयाच्या आदेशाचा विचार करणे आवश्यक आहे.
​दरम्यान, ​रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी सुवर्ण बिल्डकॉन कंपनीची परवानगी घेतल्याचा दावा केला होता. मात्र, ३१ जुलैला किंवा त्या आसपास कोणताही फोन आला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस खोटे बोलत असल्याचा आरोप कल्याणकर यांनी केला आहे.
​​मागील वर्षांच्या अनुभवावरून, येथे वाहने थांबविल्यास चालकांसाठी शौचालये, पाण्याची आणि जेवणाची कोणतीही व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे परिसरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दुर्गंधी पसरते. यावर्षी महामार्ग चार लेनचा झाल्यामुळे वाहतूक कोंडी किंवा अपघाताची शक्यता कमी झाली आहे. ​त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीशिवाय वाहने थांबविण्याचा निर्णय घेतल्यास तो न्यायालयाचा अवमान मानला जाईल. वाहतूक पोलिसांनी प्रथम न्यायालयाची परवानगी घ्यावी, अन्यथा तक्रार दाखल करण्याचा इशारा कल्याणकर यांनी दिला आहे.
......................
कोट
महामार्गावर ज्या ठिकाणी वाहने थांबविली जातात, तेथे चालक व वाहकांसाठी जेवण तसेच मोबाईल टॉयलेटची सुविधा द्यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- गजेंद्र पालवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, बांदा

Marathi News Esakal
www.esakal.com