रामेश्वर टाळमृदुंगाच्या तालावर अखंड होता डोलत

रामेश्वर टाळमृदुंगाच्या तालावर अखंड होता डोलत

Published on

श्रावणीनिमित्त....

81911

इंट्रो

भक्तांनी केलेल्या उत्सवाने आणि आनंदाने भारावलेला रामेश्वराला आज भक्त पुन्हा मंदिरात घेऊन जातील. भक्तांच्या गरड्यातून आलेल्या रामेश्वरासमोर पार्वतीमाता अमृताचा पेला घेऊन पुढे येतील, मोदकाच्या आशेने बाळ गणेश पुढे येतील, देवांना पाहून नंदी कान हलवत अलगद उभा राहून आपली मान हलवत तो मालकाचे स्वागत करेल त्याच्या गळ्यातील घुंगुराच्या आवाजाने सारा कैलास जागा होईल. भूत, गण वेगवेगळे आवाज करत जमा होतील. पण नामसप्ताहातील भक्तांच्या प्रेमाने भरल्यापोटी परतलेल्या रामेश्वराजवळ त्यांच्याकडे पाहण्यासाठी वेळ नसेल आणि ते जातील भक्तांच्या कल्याणासाठी समोर पसरलेल्या वाघ्रचर्मावर ध्यानस्त बसण्यासाठी.....आज सांगता होणाऱ्या नाम सप्ताहानिमित्ताने....!

- बापू गवाणकर, काळबादेवी
-------------------------

रामेश्वर टाळमृदुंगाच्या तालावर अखंड होता डोलत

नाही घेतला क्षणभर विसावा
थकल्या भक्ताना तुझा सहारा
सोमवारी (ता. ४) नामसप्ताहाचा सांगता दिवस. भक्त आणि रामेश्वर यांची भक्तीची आणि आनंद देण्या घेण्याची जणू चढाओढच लागली होती. भक्तीमय अखंड पहरा देणारा भक्त आणि भक्ताच्या तोंडून अखंड आठ दिवस गुणगान ऐकणारा रामेश्वर पार्वतीला विसरुन टाळमृदुंगाच्या तालावर अखंड डोलत होता.
‘जय जय विठोबा रखुमाई सावल्या विठोबा रखुमाई‘ने सुरू झालेल्या नामसप्ताहाची सुरवात ४ ऑगस्टला सकाळी ९ वाजता ‘जय जय विठोबा रखुमाई सावळ्या विठोबा रखुमाई ‘ च्या तालावर संपेल. पुन्हा शंकराच्या पूजेवर आठ दिवस घेतलेले सर्वसंग परित्यागाचे व्रत पूर्ण झाले म्हणून बेल वाहतील. रामेश्वर महाराज की जय, कालिका मातेकी जय या घोषात गुलालाने लाल झालेले फेर धरून नाचून घामाने डबडबलेले भक्तगण सभागृहाच्या बाहेर येतील. अगोदरच सजवून ठेवलेल्या पालखीला खांदा देतील . यावर्षीच एका ग्रामस्थाने दिलेल्या नव्या कोऱ्या पालखीत नागाचे छत्र घेऊन रामेश्वर महाराज विराजमान झालेले असतील, त्यांचा आजचा हा रुबाब पहाण्यासाठी पार्वतीमाता मंदिराच्या पायरीवर उभी राहून कौतुकाने बघेल. मिरवणुकीमध्ये चढलेला साज पाहून ब्रह्मविष्णू वरुण राजाच्या रुपाने पुष्पवृष्टी करतील. पालखीसमोर टाळ मृदुंगावर होणारी भजने, ढोल ताशाच्या तालावर नाचणारे भक्तगण, लेझीम मारणाऱ्या बंधूभगिनी, लहान मुले पाहून रामेश्वर आपली नेहमीची भुतावळ विसरेल आणि तो कैलासीचा राणा निघेल नामसप्ताहाच्या मिरवणुकीत प्रदिक्षणा मारण्यासाठी. ठिकठिकाणी थांबलेल्या आया बहिणींकडून दिंडीत आरती स्वीकारेल. हार, पेढे आणि लाह्यांचा प्रसाद घेत, अक्षतांचे औक्षण आणि नवसाचे नारळ स्वीकारत आशीर्वाद देईल. त्याचवेळी नवनवीन गाऱ्हाणी ऐकेल. येव्हाना मंदिरात पूर्ण झालेल्या नवसाच्या नारळ पेढ्याच्या राशी जमा होतील. नवसाच्या नारळाचा प्रसाद करण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतील. बाळगणेशाला पार्वतीमातेसह मांडीवर बसवणारा शंभू आज मात्र भक्तांच्या खांद्यावर बसून मिरवेल.
शंख फुंकिता
गजर शिवाचा
जमले सारे वाजंत्री
आज दुमदुमली हो काळबादेवी
आज दुमदुमली हो काळबादेवीच्या...या तालावर साधारण अकरा वाजता प्रदक्षिणा भक्तांबरोबर पूर्ण करून रामेश्वराची पालखी मंदिरासमोर गणेशाची आराधना करुन उभी राहील. पुन्हा रामेश्वर महाराज की जय चा जयजयकार होईल आणि आरती होईल. ब्राह्मण खोत उत्सवाचा सोहळा देवाच्या चरणी रुजू करण्याचे गाऱ्हाणे समस्त भक्तांच्यावतीने घालतील आणि जमलेली मंडळी हा आनंदाचा सोहळा डोळ्यात साठवून प्रसाद घेऊन परतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com