राजवाडी येथील पुरातन दुमजली गाभाऱ्याचे सोमेश्वर मंदिर
81916
81917
---------------
श्रावण विशेष------लोगो
राजवाडीतील दुमजली गाभाऱ्याचे सोमेश्वर मंदिर
संगमेश्वर तालुका ; परिसराची शोभा वाढवतात गरम पाण्याचे कुंड
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ः संगमेश्वरजवळ मुंबई-गोवा महामार्गावर राजवाडी येथे गरम पाण्याचे सुंदर कुंड आहे. या कुंडाच्या शेजारी एक सुंदर कौलारू मंदिर उभे आहे. त्याच्या चारही बाजूंनी तट बांधलेला आहे. पूर्वेकडे एक उंच आणि अतिशय देखणी अशी दीपमाळ असून मंदिरात एक प्रशस्त आणि उघडा सभामंडप आहे. त्याला तिन्ही बाजूंनी बसण्यासाठी कट्टे आहेत. राजवाडीतील या शिवमंदिराच्या तळातील गाभाऱ्यात शिवलिंग तर वरील मजल्यावर गणराय विराजमान आहेत. मंदिराची ही वैशिष्ट्यपूर्ण रचना अन्यत्र पाहायला मिळत नाही.
राजवाडी सोमेश्वर मंदिराच्या सभामंडपात लाकडी खांब असून, ते खांब आणि त्याच्यावर असलेल्या तुळया लाकडी कोरीव कामाने सजवलेल्या आहेत. बारीक कलाकुसर केलेले कोरीव काम आवर्जून पाहावे, असे आहे. यात घोडेस्वार, मारूती, युद्धप्रसंग अशी चित्रे कोरलेली आहेत; परंतु या सर्वात अत्यंत वेगळे आणि देखणे चित्र कोणते असेल तर ते गंडभेरूंड या पक्ष्याचे. हा एक काल्पनिक पक्षी आहे. याला एक धड आणि दोन तोंडे असतात. या पक्ष्याच्या दोन चोचीत दोन आणि त्याच्या दोन पायात दोन असे चार हत्ती त्याने धरलेले दाखवले आहेत. हत्ती हे संपत्ती, शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या मंडपाच्या दगडी प्रवेशद्वाराला सुंदर अशा द्वारशाखा कोरलेल्या आहेत. बाजूला घोड्याची तोंडे कोरलेली दिसतात. या मंडपातसुद्धा लाकडी खांब, त्यावर असलेल्या कोरीव तुळया पाहायला मिळतात. समोरच नंदी विराजमान आहे. त्याच्या मागे मंदिराचा काही भाग पाहायला मिळतो. स्थानिक सांगतात की, हा मंदिराच्या कळसावरचा कलश आहे. नंदीच्या पुढे या मंदिराचे वैशिष्ट्य पाहायला मिळते ते म्हणजे इथे एकावर एक असलेले दोन गाभारे. नंदीच्या पुढे चार पायऱ्या उतरून खालच्या गाभाऱ्यात शिवपिंडी ठेवलेली आहे, यालाच सोमेश्वर असे म्हणतात.
सोमेश्वर, आमलेश्वर, सप्तेश्वर, कर्णेश्वर ही शिवलिंगे पांडवांनी स्थापन केली, अशी ग्रामस्थांची श्रद्धा. खालच्या गाभाऱ्यातून वरच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी छोट्या ३ पायऱ्या खोदलेल्या आहेत. याच्यावर दुसरा गाभारा आहे. त्यात उजव्या हातात नाग धारण केलेली गणपतीची मूर्ती विराजमान आहे. एकावर एक असे दोन गाभारे असलेले हे अत्यंत दुर्मिळ मंदिर म्हणावे लागेल.
चौकट
मंदिरापासून जवळच भवानीगड
सोमेश्वर मंदिराचा परिसर अतिशय रम्य आहे. पाठीमागे भवानीगड नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावर जाण्यासाठी तुरळ-कडवईमार्गे रस्ता जातो. तसेच राजवाडीतूनही जंगलातून या किल्ल्यावर जाता येते. या किल्ल्यावर असलेली भवानी आणि या मंदिरातला सोमेश्वर ही या परिसरातली महत्त्वाची दैवते समजली जातात. आजूबाजूला गर्द झाडी, त्यात अनेक विविध जातींचे पक्षी, मंदिरासमोरची देखणी दीपमाळ, शेजारीच गरम पाण्याचे कुंड असा हा सगळाच परिसर फार सुंदर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.