संकटांना सामोरे जात ३०० किल्ले केले सर
81869
संकटांना सामोरे जात केले ३०० किल्ले सर
निखिल जामसंडेकरांची दुर्गभ्रमंती ; साल्हेर, कळसूबाई कठीण प्रकारातील किल्ले
अमित पंडितः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता ३ : दुर्गम गडांवर जाताना वाटा सापडत नाहीत, तर कधी चढाई अर्धवट सोडूनही यावे लागते. काहीवेळा तर किल्ल्यांवरील वाटाही विसरायला होतात. मात्र आलेल्या संकटांना सामोरे जात दुर्गभ्रमंतीचा छंद गेली दहा वर्षे जोपासला आहे. पनवेल जवळच्या कलावंतीण दुर्ग येथून सुरू झालेला दुर्ग भ्रमंतीचा प्रवास सुरू असून तो पुढे कायम जपणार आहे, असे ३०० किल्ले सर करण्याची किमया करणाऱ्या भडकंबा येथील निखिल जामसंडेकर यांनी साधली आहे.
निखिल जामसंडेकर हे मूळचे भडकंबा गावाचे. पदवी शिक्षण घेऊन ते २०१५ साली पोस्टात प्रथम नोकरीला लागले. सध्या ते रत्नागिरी येथे टपाल खात्यात सॉर्टिंग असिस्टंट या पदावर नोकरी करतात. लहानपणी दिवाळीत किल्ले तयार करताना इतिहास आणि दुर्ग याविषयी ओढ निर्माण झाली. शिक्षण मुंबई येथे झाले असल्याने दिवाळीला सुट्टीत ते गावी येत, तेव्हा दरवर्षी दिवाळीत घरी अंगणात किल्ला तयार करत होते. त्यामधून किल्ल्यांविषयी ओढ वाढत गेली. पुढे नोकरी लागल्यावर त्यांनी दुर्ग भ्रमंतीला सुरवात केली. पनवेल जवळचा कलावंतीण दुर्ग हा पहिला किल्ला त्यांनी सर केला. दशकभराच्या आपल्या भ्रमंतीत त्यांनी ३०० किल्ले सर केले आहेत. कलावंतीण दुर्ग, साल्हेर किल्ला, कळसूबाई हे अत्यंत कठीण किल्ले त्यांनी सर केले. संगमेश्वर तालुक्यातील प्रचितगड हा किल्लाही त्यापैकीच एक. मृग गड आणि विजयापुरा हे अवघड चढाईसाठी प्रसिद्ध असलेले गडही जामसंडेकर यांनी सर केले आहेत. पार्ले ट्रेकर्स आणि खेड येथील महाराजा प्रतिष्ठान या दोन संघटांशी जामसंडेकर निगडीत आहेत. दुर्ग स्वच्छता, शैक्षणिक मदत असा उपक्रमात सहभाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
पंधरा फुटावर बिबट्याचे दर्शन
नाशिक जवळच्या कात्रा किल्ल्यावर चढाई करतानाची आठवण अंगावर शहारा आणणारी आहे. काही सहकाऱ्यांबरोबर जामसंडेकर किल्ला चढत होते. त्यांचा एक मित्र गडाच्या मागील बाजूने चढत गडावर गेला. जामसंडेकर आणि त्यांचे मित्र यांना वाटेत एक गुहा दिसली. तिथे जामसंडेकर फोटो काढत होते. त्यांच्या समोर अचानक बिबट्याने उडी मारली. अवघ्या पंधरा फुटांवर त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर मात्र त्यांनी तिथूनच माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
कोट
स्थानिक नागरिकांमध्ये किल्ल्यांबद्दल, त्याच्या इतिहासाविषयी निरुत्साह दिसतो. अनेक ठिकाणी पर्यटक किल्ल्याच्या पावित्र्याविषयी अनभिज्ञ असतात. अनेक किल्ल्यांवर मुख्य दरवाजा, बुरूज अशा ठिकाणी दुकाने थाटलेली असतात. ते पाहिल्यावर किल्ल्याचे सौंदर्य जपण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. आज अनेक किल्ल्यांवर जाऊन तरुणाई केवळ रिल्स बनवतात. त्यातून ते किल्ला किती जाणून घेतात याबद्दल शंकाच आहे.
- निखिल जामसंडेकर