एका दगडावर उभारलेले अनोखे लोटेश्वर मंदिर
81912
81913
श्रावण विशेष--------लोगो
एका दगडावरील लोटेश्वर मंदिर
दर्शनासाठी प्रचंड गर्दी ; केंबळी मंदिराचे घुमटाकार मंदिरात रूपांतर
सुधीर विश्वासराव ः सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ ः विशिष्ठ रचनेमुळे रत्नागिरी तालुक्यातील डुगवे येथील लोटेश्वर हे स्वयंभू मंदिर सर्वपरिचित आहे. या मंदिराबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. मंदिराभोवतीचे सुंदर निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. श्रावण महिन्यात अनेक भाविक आवर्जून या मंदिराला भेट देतात. फक्त एका दगडावर उभे असलेले अनोखे मंदिर कोकणात प्रसिद्ध आहे.
रत्नागिरीपासून सुमारे २५ किमी अंतरावर कुरतडेजवळील डुगवे गावात हे मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी पाण्याचा ओढा आहे. हा ओढा बारा महिने प्रवाहित असतो. एका अखंड दगडावर हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या सभोवती घनदाट जंगल आहे. डुगवे गावात पाषाणावर स्वयंभू श्री लोटेश्वराचे देवस्थान आहे. प्राचीन काळात सध्या असलेल्या मंदिर परिसरात घनदाट जंगल होते. त्या गावामध्ये एक ब्राह्मणाचे घर होते. (त्याचे नाव आता कोणालाही सांगता येत नाही). त्या मालकाकडे गायी व बैल होते. ते सांभाळण्यासाठी एक गुराखी होता. तो गुराखी रोज जंगलात गुरे चरविण्यासाठी घेऊन जायचा. त्यातील एक गाय गुराख्याची नजर चुकवून नेहमी (जिथे स्वयम् श्री लोटेश्वर विराजमान आहेत तो पाषाण) येथे जायची. त्याठिकाणी वेलींचे मोठे जाळे होते. ती गाय चढून उंच पाषाणावर जाऊन दुधाचा पान्हा सोडायची आणि परत गुरांमध्ये जाऊन मिसळायची. हे गुराख्याला माहिती नव्हते. घरी आलेली गाय दुध देत नाही म्हणून मालक गुराख्यावर दुध चोरीचा संशय घेत होता. एक दिवस गुराख्याने त्या गायीवर पाळत ठेवली. तेव्हा त्याच्या असे निदर्शनास आले की ती गाय वेलींच्या जाळीवरुन जाऊन एका मोठ्या पाषाणावर पान्हा सोडतेय हे पाहून तो आश्चर्यात पडला. त्याने मालकाजवळ येऊन हा प्रकार कथन केला. ते ऐकून मालकाला राग आला. तो हातात कोयती घेवून आला आणि वेलींच्या वाटेने जाऊन त्याने त्या वेलींमध्ये अडकलेल्या भागावर घाव घातला. वेलींचे दोर तुटून त्या ठिकाणी शिवलिंग दिसले. आघात झाल्यामुळे शिव-लिंगाला थोडा छेद गेला.
हा प्रकार गावामध्ये समजल्यानंतर ग्रामस्थांनी देवासमोर लोटांगणे घातले. शिवलिंगाचे दर्शन घडले, तो दिवस पौष महिन्यातील सोमवार होता. त्यानंतर ग्रामस्थांनी जंगल साफ केले आणि पाषाणावर गवताचे (केंबळी) मंदिर बांधले. भाविकांना दर्शन घेण्यासाठी कळकाच्या (बांबूचा प्रकार) साह्याने ओढा ते पाषाणापर्यंत निसण (शिडी) तयार केली. पुढे ६० व्या दशकात वादळामध्ये मंदिराचे नुकसान झाले होते. त्यामुळे कौलारु मंदिर उभे राहिले. आता या घुमटाकार मंदिरामध्ये रुपांतर झाले. २४ डिसेंबर २०१८ रोजी मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा झाला.
चौकट
गुराख्यांचे जेवण प्रसादाचे वाटप
श्री स्वयंभू लोटेश्वर पौष महिन्यात प्रकट झाले म्हणून आणि श्रींचे दर्शन प्रथम गुराख्याला झाले म्हणून पौष महिन्याच्या सोमवारी गुराख्यांचे जेवण म्हणून देवाचा नैवेद्य केला जातो. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाचा लाभ दिला जातो. तसेच शिवरात्रीलावेळी श्री स्वयंभू लोटेश्वर मंदिरामध्ये शिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.