वक्तृत्व स्पर्धेत वेदिका हरवडे प्रथम
वक्तृत्व स्पर्धेत वेदिका हरवडे प्रथम
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरामार्फत टिळक पुण्यतिथीनिमित्त तीन गटांत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये आनंदराव पवार कॉलेजची वेदिका विष्णू हरवडे प्रथम, डीबीजेची मीरा मनोज पोंक्षे द्वितीय, तृतीय क्रमांक मार्गताम्हानेच्या सिद्धी विजय लांजेकर हिला मिळाला. माध्यमिक गटात सती हायस्कूलची मृणयी प्रसाद जोग, एसपीएमची स्वरा प्रराग खैर, युनायटेडची ओवी सागर भावे, तर प्राथमिक गटात युनायटेडचा स्वराज रामकृष्ण कदम, वसंतराव भागवत विद्यालय मार्गताम्हणेची शुभ्रा मिलिंद यादव, सती हायस्कूलचा वेदांत महेंद्र महाडिक यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, विनायक ओक, अभिजित देशमाने, राष्ट्रपाल सावंत आदी उपस्थित होते.
रामराजे महाविद्यालयात रानभाज्या प्रदर्शन
दापोली : दापोली येथील रामराजे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात रानभाज्यांच्या नावीन्यपूर्ण आणि आरोग्यदायी, स्वादिष्ट पाककृती प्रदर्शित करण्यात आल्या. कोकणात आढळणाऱ्या भारंगी, टाकळा, कुर्डू, करटोली, चिचार्डी, प्याव, दार, मायाळू, तेरी, अळू, कोवळा बांबू, दिंडा, कुडा, आंबुशी, पाथरी, शेवगा, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, खापरफुटी, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, आंबाडी, सुरण, उंबर आदी रानभाज्यांपासून बनविलेल्या पाककृतींचा यात समावेश होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी येथील प्रगतिशील युवा शेतकरी आणि जॅकफ्रूट किंग मिथिलेश देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी रामराजे महाविद्यालयाचे संदीप राजपुरे, संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, डॉ. दीपक हर्डीकर आदी उपस्थित होते.