शिवापूरमध्ये ‘लंपी’ने गाय, वासराचा मृत्यू
शिवापूरमध्ये ‘लंपी’ने
गाय, वासराचा मृत्यू
दुकानवाड ः शिवापूर-कोठीवाडी येथील सीताराम नारायण राऊळ यांची गाय व वासरू लंपी आजाराने मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेली दोन महिने या भागात लंपीची अनेक जनावरांना लागण झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, सर्वच गावांत हे अधिकारी न पोहोचल्याने बरीच गावे अद्याप लसीकरणापासून वंचित राहिली आहेत. तोपर्यंत अनेक जनावरे दगावत आहेत. नुकतेच हळदीचे नेरूर येथे लसीकरण झाले, तर दुकानवाड भागातील पुळास, निळेली, शिवापूर, उपवडे, वसोली गावांत अद्याप लसीकरण झालेले नाही. या गावांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
...................
पीक विमा योजनेसाठी
शासनाकडून मुदतवाढ
कणकवली ः पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी शासनाने कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदत वाढविली आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३०, तर बिगर कर्जदारांसाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २४ जून २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यात पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी ३० जुलै ही अंतिम तारीख दिली होती. मात्र, गतवर्षीपेक्षा शेतकऱ्यांचा कमी सहभाग, शेतकरी वर्गाकडे शेतकरी ओळख क्रमांक नसणे, शासनाच्या पोर्टल व सीएससी सर्व्हरवरील अडथळे, भूमी अभिलेख पोर्टलवरील अडथळे आदी बाबी लक्षात घेऊन शासनाने या योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी कृषी विभागाने विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिल्या आहेत.
.......................
पंचक्रोशी भजन स्पर्धेचे
सातार्डा येथे आयोजन
सावंतवाडी ः सातार्डा येथील पंचक्रोशी टिळक ग्रंथालयातर्फे ७ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता पंचक्रोशी मर्यादित भजन स्पर्धेचे आयोजन तरचावाडा महापुरुष मंदिरात केले आहे. पृथ्वीराज मांजरेकर यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. प्रथम विजेत्या भजन मंडळांना ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार रुपये व वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम सहभाग घेणऱ्या सहा भजन मंडळांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक भजन मंडळांनी ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांच्याशी शुक्रवारपर्यंत (ता. ८) संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---
सातार्ड्यात आज
अखंड हरिनाम सप्ताह
सावंतवाडी ः सातार्डा ग्रामदैवत श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाला उद्या (ता. ५) दुपारी १२ वाजता प्रारंभ होणार आहे. स्थानिक भजन मंडळांची भजने होणार आहेत. रात्री १२ वाजता देऊळवाडी, मेसवाडी, तरचावाडा येथील मंडळांचे चित्ररथ देखावे सादर केले जाणार आहेत. दुसऱ्या दिवशी बुधवारी (६) दुपारी दोनच्या दरम्यान दहिकाल्याने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
......................
कलमठला आजपासून
सांस्कृतिक कार्यक्रम
कणकवली ः कलमठ-बाजारपेठ येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त उद्या (ता. ५) व बुधवारी (६) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या सकाळी ११ वाजता घटस्थापना, त्यानंतर अहोरात्र गावातील प्रत्येक वाडीतील भजनाची वारी (पार) होणार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता पालखीची नगर प्रदक्षिणा, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केले आहे.
----
शिरशिंगेत आज
आरोग्य चिकित्सा
सावंतवाडी ः शिरशिंगे ग्रामपंचायतीतर्फे उद्या (ता. ५) सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे. ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीपक राऊळ यांनी केले आहे.