नियुक्तीसह वेतन प्रश्नाबाबत लिपिकाचा कुटुंबासह ठिय्या
82077
नियुक्तीसह वेतनप्रश्नाबाबत
लिपिकाचा कुटुंबीयांसह ठिय्या
सिंधुदुर्गनगरीत बेमुदत उपोषण
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः शासन निर्णयानुसार वैयक्तिक मान्यताप्राप्त स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती आदेश द्यावा, तसेच जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत थकीत राहिलेले वेतन तत्काळ मिळावे, या मागणीसाठी जामसंडे येथील प्रमोद सोनकुसरे यांनी कुटुंबीयांसमवेत आजपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
श्री. सोनकुसरे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘आपण दिलेल्या २ जानेवारी २०२५ च्या लेखी आदेशानुसारच ३ जानेवारीला देवगड तालुक्यातील संबंधित शाळेत वरिष्ठ लिपिक या पदावर नियमितपणे सेवेत रुजू झालो. तथापि शासन निर्णयातील तरतुदीनुसार आजअखेर आपणाकडून विहित नमुन्यातील स्वतंत्र नियुक्ती आदेश मिळाला नाही. तेव्हा, जानेवारी ते जुलै दरम्यानचे वेतन मिळाले नाही. यामुळे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेट घेऊन लक्ष वेधले असतानाही अद्याप नियुक्ती आदेश मिळाला नाही. तसेच जानेवारीपासून आजपर्यंत वेतन दिलेले नाही. त्यामुळे कुटुंबीयांची उपासमार होत आहे. आपल्याकडून तत्काळ अधिसंख्य पदावर नियुक्तीचे लेखी आदेश द्यावेत. तसेच थकीत वेतन मिळावे.’
श्री. सोनकुसरे यांनी आजपासून आपली आई, पत्नी व मुलगा यांच्यासह जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील व याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.