कुंभार्ली घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक
82027
कुंभार्ली घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक
मुसळधार पावसाने खड्डेच खड्डे ; दरडी कोसळतील अशी १२ ठिकाणे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ः वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कुंभार्ली घाट रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुसळधार पावसामुळे घाट रस्ता कोणत्याही क्षणी बंद पडेल अशी स्थिती आहे. घाटातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर १३ कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतरही हा घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
पाटण तालुक्यातील वझेगाव येथे रस्ता वाहून गेल्यानंतर गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग १७ दिवस बंद होता. त्यावेळी कुंभार्ली घाट रस्त्याची दुरुस्ती करणे सार्वजनिक बांधकाम विभागाला शक्य होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. मे महिन्यात पडलेला पाऊस वगळता जून व जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झालेला नाही. तरीही घाट रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. ठिसूळ संरक्षक कठडे, गटारांची दूरवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने जागोजागी पडलेली भगदाडं, दरडी कोसळण्याचा कायम असलेला धोका यामुळे यावर्षी कुंभार्ली घाट धोकादायक स्थितीत आहे.
कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी मातीची दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने ती तत्काळ हटवली. मात्र दरडी कोसळू नये, यासाठी बोल्डर नेटचा वापर करण्याची गरज आहे. ज्या ठेकाणी नेट बसविण्यात येतील, तिथे दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी होत आहे. याशिवाय डोंगरातील लहान-मोठे दगड कोसळले तर ते जाळीत अडकून बसतात. एखाद्या वाहनांवर थेट दगड पडण्याचा धोका नसतो; परंतु गेल्या आठ ते दहा वर्षांत अशा स्वरुपाच्या नेटचा वापरली गेलेली नाहीत. दरडी कोसळल्यानंतर त्या हटवून मार्ग मोकळा करण्यातच धन्यता मानली जाते. रात्री-अपरात्री दरडी कोसळल्यास महामार्ग बंद ठेवावे लागतो. परंतु त्यामधून कोणताही धडा प्रशासनाने घेतलेला नाही. या मार्गावर कोणत्याही क्षणी दरडी कोसळतील अशी १२ हुन अधिक ठिकाणे असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
घाटरस्त्यांच्या डोंगराकडील बाजूने वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न केल्यामुळे रस्त्यावरील डांबराचा थर वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी केवळ खडी दिसत आहे. तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पोफळीतून जाताना कुंभार्ली घाट सुरू होतो. घाटातील प्रवेशद्वारावरील रस्ताच वाहून गेलेला आहे. पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गटारातील सर्व पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्ता खचण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच वाहून गेलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहतात. पावसाळ्यापूर्वी घाटरस्त्यांवरील गटारांची साफसफाई केली जाते. त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष झाल्याचे यंदा दिसत आहे. एखाद्या ठिकाणी रस्त्याला छोटा खड्डा पडलेले असेल तर तो तातडीने बुजवून टाकला जात नाही. त्यामुळे घाटातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत.
कोट १
पावसाळा सुरू झाल्यानंतर घाटात दरवर्षी खड्डे पडतात. बांधकाम विभागाने त्यावर उपाययोजना केल्या तरीही त्या कायमस्वरूपी नाहीत. हा दरवर्षीचा अनुभव आहे. घाटातील वळणावर गवत उगवले आहे. अनेक ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. वाढलेली झुडपे बांधकाम विभागाला दिसत नाहीत.
- शब्बीर मुल्ला, वाहतुकदार, चिपळूण
..................
कोट २
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत, ते बुजवण्याची सूचना ठेकेदाराला केली आहे. कुंभार्ली घाट रस्त्याकडे आमचे विशेष लक्ष आहे. वाढलेली झाडे तोडण्याची आणि रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची सूचना ठेकेदाराला केली आहे.
- अरुण मुलाजकर, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.