गणरायाची मूर्ती बनविण्यासाठी आठ महिन्यांची मेहनत
82091
गणरायाची मूर्ती बनविण्यासाठी आठ महिन्यांची मेहनत
गणेश कार्यशाळा गजबजल्या; धामणीतील देवरूखकरांना शंभर वर्षांची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणरायाचे आगमन होण्याच्या काही दिवस आधी बाजारपेठा सजायला लागतात. त्यात मुख्य आकर्षण असते ते बाप्पाच्या मूर्तीचे. अलीकडच्या काळात, तर गणरायाच्या विविध मूर्ती बाजारात पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांना आकर्षित करणाऱ्या या मूर्ती साकारण्यामागे मूर्तिकारांना आठ ते दहा महिन्यांची मेहनत घ्यावी लागते. अनेक कष्टकऱ्यांच्या हातातून मूर्ती घडते. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील देवरुखकर बंधू यांच्या गणेशमूर्ती शाळेला गणेशमूर्ती बनविण्याची शंभर वर्षांची परंपरा आहे.
अलीकडच्या काळात शाडूमातीच्या गणपतीची मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून या मूर्तींबाबत प्रशासनाकडून जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे आता या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती घराघरात पाहायला मिळतात. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी हा सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आता आकार घेत आहे. त्याला रंग दिला जात आहे. विविध अलंकारांनी मूर्ती सजवली जात आहे. धामणी येथील ओंकार देवरूखकर यांनी आजोबा व वडिलांनी सुरू केलेली गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा कायम जपली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंबच यामध्ये मदत करते. शाडूमातीच्या गणेशमूर्ती या हातानेच बनवल्या जातात. त्याला योग्य ते रूप देता यावे म्हणून बाहेरचे कारागीर आणले जात नाहीत. खरेतर पीओपीपेक्षा शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी सर्वाधिक मेहनत लागते.
चौकट
शाडूमातीची मूर्ती बनविण्यास वेळ लागतो
शाडूमातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी वेळ लागतो. पीओपी लवकर घट्ट होते, तर शाडूमाती ही मऊ असते; मात्र पीओपीच्या मूर्ती साच्यात बनवल्या जातात, तर शाडूमातीच्या मूर्ती या हाताने आणि साच्यातून दोन्हीप्रकारे तयार केल्या जात आहेत. त्यांना हवा तो आकार देता येतो. शेवटपर्यंत त्याच्यावर काम करता येते; मात्र हाताने याचे काम असल्याने त्याला वेळही तितकाच लागतो. गणेशमूर्ती बनवण्यासाठी लागणारी ही माती वेगवेगळ्या ठिकाणाहून आणली जाते. कधी गुजरात, तर कधी मुंबईहून ही माती उपलब्ध होत असते. मूर्तींना रंग देताना स्प्रे पेंटिंगचा १० ते २० टक्के वापर केला जातो; मात्र ८० टक्के रंगकाम हे हातानेच केले जाते. शिवाय मूर्तीचे डोळे, गंध अशा प्रकारांचे अलंकारही हातानेच काढले जातात, असे अश्विनी देवरुखकर यांनी सांगितले.
कोट
शाडूमातीच्या गणेशमूर्तीला हवा तो आकार आपण देऊ शकतो. कारण, ती माती वाळवणे सोपे असते. असे असले, तरी संपूर्ण काम हे हातावरच असल्याने त्याला भरपूर वेळही लागतो. छोट्या आकाराची एक गणेशमूर्ती तयार होण्यासाठी साधारण पाच ते सहा दिवस लागतात, तर मंडळाच्या तीन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. कारण, मोठ्या मूर्तींना उभे करणेच एक आव्हान असते.
- निखिल देवरुखकर, मूर्तिकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.