देशभरातील चित्रकारांची रंगरेखा कार्यशाळा गांग्रईत

देशभरातील चित्रकारांची रंगरेखा कार्यशाळा गांग्रईत

Published on

देशभरातील चित्रकारांची रंगरेखा कार्यशाळा गांग्रईत
प्रा. प्रकाश राजेशिर्के ः ३० हून अधिक नामवंत चित्रकारांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ४ : पंचमहाभूतांच्या सांनिध्यातून निर्माण झालेला निसर्ग हा चित्रकारांचा गुरु आहे. कोकणातील निसर्गाच्या सांनिध्यात देशभरातील चित्रकारांनी यावे, त्यांनी आपली कला रेखाटावी आणि आपल्या कलेबाबतचे अनुभव इतरांना सांगावेत. या हेतूने ६ ते १३ ऑगस्ट या कालावधीत देशभरातील चित्रकारांची रंगरेखा कार्यशाळा गांग्रई (ता. चिपळूण) येथे आयोजित केली आहे, अशी माहिती कार्यशाळेचे आयोजक ज्येष्ठ चित्रकार सावर्डे येथील प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी दिली.
रंगरेखा कार्यशाळा पुष्कर कृषी पर्यटन केंद्रात होणार असून त्यामध्ये मुंबई, पंजाब, चेन्नई, गुजरात, कोल्हापूर, नागपूर आदी राज्यातील ३० हून अधिक नामवंत चित्रकार सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेबाबत अधिक माहिती देताना राजेशिर्के म्हणाले, कार्यशाळेचे हे पाचवे वर्ष आहे. कार्यशाळेत भगवान चव्हाण (चेन्नई), डॉ. सौम्या सुरेश कुमार (मुंबई), जावेद मुलानी (नवी मुंबई), अब्दुल गफार (नागपूर), विष्णू परीट (संगमेश्वर), बालाजी भांगे (पंजाब), चंद्रकांत प्रजापती (गुजरात), बुद्धभूषण सपकाळे (मुंबई), राजेंद्रकुमार हाकारे (कोल्हापूर), नीलेश शिळकर (रत्नागिरी) आदी चित्रकार सहभागी होणार आहेत. या सर्व कलाकारांचे जेवण, निवास, प्रवास, मानधन, कागद, रंग, ब्रश व अन्य साहित्याचा खर्च कॅमल कंपनी व पुष्कर कृषी पर्यटन केंद्र करणार आहे. सर्व कलाकारांनी कोकणातील निसर्गाच्या सांनिध्यात चित्रे रेखाटावीत आणि रात्री आपले अनुभव इतरांना कथन करावेत, असे कार्यशाळेचे स्वरूप आहे. कोकणातील ग्रामीण भागातील उदयोन्मुख चित्रकारांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन या कलाकारांशी हितगुज साधावे, असे आवाहन राजेशिर्के यांनी केले.
-----
चौकट
चित्रांचे मुंबईत प्रदर्शन
कलाकार हा मुळातच संवेदनशील असतो. त्याची समाजाशी नाळ जोडलेली असते. याच भावनेतून सर्व नामवंत कलाकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन जानेवारी २०२६ मध्ये मुंबई प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलादालनात भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रांच्या विक्री झालेल्या रक्कमेतून दहा टक्के रक्कम कोकणातील सेवाभावी संस्थांना देण्यात येणार असल्याचे श्री. राजेशिर्के यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com