जिल्ह्यातील ३५० शिक्षक निवडणूक कामात
जिल्ह्यातील ३५० शिक्षक निवडणूक कामात
कामकाजावर परिणाम ; प्राथमिक शिक्षकांना वगळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने व शिक्षक समितीने वारंवार केली आहे. शिक्षकांची एक हजार पदे रिक्त असताना ३५० शिक्षकांना निवडणुकीची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळेतील शिक्षणासह कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. मुख्याध्यापक, सहशिक्षक, प्राथमिक पदवीधर मिळून एक हजार पदे रिक्त आहेत. त्यात ३५० शिक्षकांना निवडणूक कामासाठी पाठवले तर शाळा ओस पडण्याची भीती आहे. प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली. अशैक्षणिक कामासाठी नियुक्ती करण्यास मनाई केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत नव्याने नावनोंदणी करणे, नावात किंवा पत्यात बदल, दुरुस्ती करणे, मृतांची नावे वगळणे, रंगीत फोटोसहित यादी करण्याचे काम करावे लागते. एका मतदार केंद्रावर एक याप्रमाणे निवडणुकीची नियुक्ती केली जाते. शासनाने विविध शालेय उपक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची जबाबदारी शालेय पोषण आहार, गाव सर्वेक्षक रेकॉर्ड ठेवणे यासारखी शिक्षणाशी संबंध नसलेली विविध काम शिक्षकांना करावी लागतात.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक वर्गातील शिक्षकांची किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गातील किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. सध्या प्राथमिक शिक्षकांना विविध प्रकारची २३ कामे करावी लागतात. हे लक्षात घेऊन अशैक्षणिक कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्य कार्याध्यक्ष संतोष कदम रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे, सत्यजित पाटील, सुरेंद्र रणसे, दिलीप तारवे, संतोष रावणंग, मनीष शिंदे, अशोक सुर्वे, रवींद्र कुळ्ये, राजेश सोहनी, मंगेश मोरे, नानासाहेब गोरड, मनोजकुमार खानिवलकर, नीलेश देवकर, सतीश मुणगेकर, महेंद्र रेडेकर यांनी केली आहे.
---