पर्यावरण संवर्धनासाठी दापोलीत वृक्षदिंडी
82133
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षदिंडी
दापोलीत उपक्रम ; विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ५ : शिक्षण संस्था, पोलिस प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या उल्लेखनीय सहभागातून वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या संकल्पनेतून दापोलीत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
वृक्षदिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस. टी. बस स्थानक, केळकर नाका, उपजिल्हा रुग्णालय मार्गे वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. यामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक, घोषवाक्ये आणि घोषणा यांद्वारे समाजप्रबोधन केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. ‘माँ के नाम एक पेड’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या मातांच्या सन्मानार्थ एक झाड लावून पर्यावरणप्रेमासोबत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. या उपक्रमात आंबा, बदाम, आवळा अशा स्थानिक व उपयोगी वृक्षांची लागवड केली होती. हवामान बदल आणि कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारचे वृक्ष उपयुक्त ठरतात. याप्रसंगी दापोलीचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्रकुमार यादव म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, वृक्षारोपणाची सवय लागावी आणि नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व पटावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे.’’