बौद्धवस्त्यांमधील स्मशानभूमीमध्ये सुविधांचा अभाव
-ratchl४४.jpg-
25N82288
चिपळूण ः स्मशानभूमीची पाहणी करताना शहरप्रमुख सकपाळ व ग्रामस्थ.
बौद्धवस्त्यांमधील स्मशानभूमीत सुविधांचा आभाव
उमेश सकपाळांकडून पाहणी ; पालिकेकडे उपाययोजनांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः शहरातील बौद्ध वस्त्यांसाठी असलेल्या स्मशानभूमीतील अत्यंत असुविधाजनक परिस्थितीविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी स्मशानभूमीची तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. पालिकेशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.
स्मशानभूमीला जाण्यासाठी सध्या कोणताही योग्य रस्ता उपलब्ध नाही. उभारलेली शेड चुकीच्या पद्धतीने बांधलेली असून ती जीर्ण झालेली आहे. शेजारील नदीमुळे जागेची धूप होत असल्याने संरक्षक भिंतीची गरज व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय अस्तित्वात असलेली शेड देखील दुरुस्त करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच मुद्द्यावर आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीसही उमेश सकपाळ यांनी उपस्थिती दर्शवून, स्मशानभूमीच्या समस्यांबाबत सहकार्याची भूमिका मांडली. या स्मशानभूमीत आवश्यक सुधारणा तातडीने करण्यात येतील आणि पालिकेच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन सकपाळ यांनी दिले.
ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागण्या आणि असुविधांमुळे उद्भवलेली ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून तातडीने ठोस कृती होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली.
चौकट ः
तोडगा काढण्याचे आश्वासन
शहरातील पेठमाप बौद्धवाडी, गोवळकोट बौद्धवाडी, तारा बौद्धवाडी, सुबा बौद्धवाडी आणि कदम बौद्धवाडी या पाच बौद्ध वाड्यांतील नागरिकांनी स्मशानभूमीच्या गैरसोयीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत १५ ऑगस्टपासून अन्न-पाण्याचा त्याग करण्याचा इशारा पालिकेला दिला होता. या घटनेची आमदार शेखर निकम यांनी तातडीने दखल घेत महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन पाचही वाड्यांच्या पंच प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सविस्तर बैठक घेतली. निकम यांनी त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.