जखमी वृद्धाला वाचविल्याने ‘खाकी’तील माणुकीचे दर्शन
82273
जखमी वृद्धाला वाचविल्याने
‘खाकी’तील माणुकीचे दर्शन
अमित राऊळ यांची समयसूचकता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः वेळेवर रुग्णवाहिका किंवा इतर कोणतेही वाहन उपलब्ध न झाल्यामुळे अपघातात जखमी झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला सावंतवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी अमित राऊळ यांनी आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेत धावत रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या समयसूचकतेमुळे जखमी वृद्धाचे प्राण वाचले. या धाडसी कामगिरीबद्दल राऊळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही घटना रविवारी (ता.३) रात्री साडेआठच्या सुमारास येथील तीन मुशी परिसरात घडली. बाळा राऊळ (वय ६५, रा. घावनळे) हे आपल्या दुचाकीवरून जात असताना एका भरधाव दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत बाळा राऊळ दुचाकीसह रस्त्याकडेला असलेल्या गटारात कोसळले. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. मात्र, कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. जखमीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी काही जणांनी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही गाडी थांबविली नाही. तातडीने १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन केला. पण, पंधरा मिनिटे उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. हा सर्व प्रकार तेथून जाणाऱ्या पोलिस कर्मचारी अमित राऊळ यांनी पाहिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी राऊळ यांना आपल्या दोन्ही हातांवर उचलले आणि रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे बाळा राऊळ यांचा जीव वाचला. राऊळ यांच्या या धाडसी आणि माणुसकीच्या कृतीमुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि जखमीच्या नातेवाईकांनी त्यांचे विशेष कौतुक केले.