कणकवली शहरातील नागवे, नरडवे रस्त्यावरचे खड्डे बुजवा
नागवे, नरडवे रस्त्यावरचे
खड्डे बुजवा ः युवासेना
कणकवली,ता. ५ ः शहरातील जुना नरडवे रस्ता तसेच नागवे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, शाखाप्रमुख महेश राणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांना आज दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या श्रावण महिना सुरू आहे. कणकवली शहराचे ग्रामदैवत असलेले श्रीस्वयंभू आणि रवळनाथ ही मंदिरे नागवे रस्त्यावर आहेत. या मंदिरांमध्ये जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. तसेच पुढील काळात गणेशोत्सव असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढणार आहे. दरम्यान, कणकवली-नागवे या शहर हद्दीतील रस्त्याबरोबरच जुना नरडवे रस्त्यावरील पटकीदेवी मंदिर ते कामतसृष्टी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ता दुतर्फा गवत आणि झाडी वाढल्याने रस्त्यालगतचे गटारे, खड्डे यांचा अंदाज येत नाही. त्याचा मोठा त्रास वाहन चालकांना होतो. त्यामुळे रस्ता दुतर्फा झाडी साफ करावी. कणकवली शहरात मच्छीमार्केट, कांबळी गल्ली तसेच पिळणकरवाडी भागात भटक्या कुत्र्यांचा मोठा उपद्रव आहे. या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करावे, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.