बापर्डेत बीएसएनएल मोबाईल संपर्कहिन

बापर्डेत बीएसएनएल मोबाईल संपर्कहिन

Published on

82353

बापर्डेत बीएसएनएल मोबाईल संपर्कहिन
ग्रामस्थ हैराणः उपमंडळ अधिकारी सुधाकर हिरामणी यांच्यासोबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ५ः तालुक्यातील बापर्डे गावातील बीएसएनएल मोबाईल मनोऱ्याची सेवा विस्कळित होत असल्याने तेथील स्थानिक ग्राहक अस्वस्थ आहेत. बीएसएनएल मोबाईल संपर्कहिन होत असल्याने ग्रामस्थांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सेवा सुधारण्याच्या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी आज येथील दूरसंचारचे उपमंडळ अधिकारी सुधाकर हिरामणी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, यातून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्‍वासन श्री. हिरामणी यांनी ग्रामस्थांना दिले.
बापर्डे गावातील बीएसएनएल सेवा विस्कळित होत असल्याने स्थानिक ग्रामस्थ हैराण आहेत. मोबाईलला रेंज नसल्याने अनेकांचा संपर्क होत नाही. त्यामुळे सेवा सुधारण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी येथील दूरसंचार कार्यालयात धाव घेतली. दूरसंचारचे उपमंडळ अधिकारी हिरामणी यांची कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, विश्‍वास नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, भगवान नाईकधुरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. बीएसएनएल मनोऱ्याची रेंज येत नसल्याने मोबाईल संपर्कहिन होतात. त्यामुळे अनेक कामांचा खोळंबा होत असल्याकडे ग्रामस्थांनी दुरसंचारचे लक्ष वेधले. अनेक कामांची यामुळे अडचण होत असल्याचा मुद्दा मांडला. मोबाईल मनोऱ्याच्या ठिकाणी असलेल्या बॅटऱ्या उपयोगिताहिन असल्याचे तसेच जनरेटरही कार्यान्वित नसल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यावर मोबाईलची रेंज जात असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. सेवेमध्ये तातडीने सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. मोबाईलसाठी जाणारी फायबर लाईन समस्येमुळे रेंज येत नसावी, असे श्री. हिरामणी यांनी त्यांना यावेळी सांगितले. याबाबत तातडीने हालचाली करून सेवा सुधारण्यात येईल, असे आश्‍वासित केले.

कोट
अलिकडेच बापर्डे गावातील मोबाईल मनोऱ्याची फायबर तुटली असल्याने अशी समस्या उद्भवत असावी. तसेच तेथे असलेल्या बॅटऱ्या उपयोगिताहिन झाल्या आहेत. जनरेटरही कार्यान्वित नसल्याने काही समस्या उद्भवत आहेत.
- सुधाकर हिरामणी, दूरसंचार उपमंडळ अधिकारी, देवगड

Marathi News Esakal
www.esakal.com