संगमेश्वर -माने महाविद्यालयाची निवड
सॅप तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी
माने महाविद्यालयाची निवड
संगमेश्वर, ता. ५ ः उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आंबव (देवरूख) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड झाली आहे. सॅप टेक्नॉलॉजी आणि त्यामधील रोजगार संधी या विषयावर माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेत हे जाहीर करण्यात आले. अलिबाग येथील उत्कर्ष फाउंडेशन या नामांकित संस्थेच्या कंपनीच्या तज्ज्ञांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष रवींद्र माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, उत्कर्ष फाउंडेशनचे विलास कुबल तसेच प्रकाश बागल, दिलेंद्र शिरधनकर, महेश कोरे, राहूल पाटील उपस्थित होते. त्यानंतर शिरधनकर यांनी विद्यार्थ्यांना सॅप सॉफ्टवेअरबद्दल मुलभूत माहिती दिली. ईआरपी सॉफ्टवेअरचे महत्त्व आणि रोजगारासाठीची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले.