माडखोलच्या वीज समस्या सोडविण्याची ग्वाही

माडखोलच्या वीज समस्या सोडविण्याची ग्वाही

Published on

माडखोलच्या वीज समस्या सोडविण्याची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः माडखोल गावातील विविध वीज समस्यांबाबत ग्रामस्थांनी पुकारलेले ‘जोडे मारो’ आंदोलन महावितरणच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. उपअभियंता शैलेंद्र राक्षे यांनी गावात जात ग्रामस्थांशी चर्चा करुन वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या चार महिन्यांपासून माडखोल गावातील विजेच्या समस्या जैसे थे होत्या. याबाबत महावितरणला वारंवार विनंती करूनही कोणतीही कार्यवाही होत नव्हती, त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सहा दिवसांपूर्वी सावंतवाडी कार्यालयासमोर उपअभियंत्यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून ‘जोडे मारो’ आंदोलन केले. याची दखल घेत महावितरणने तातडीने गावातील समस्या सोडवण्यास सुरुवात केली. उपअभियंता राक्षे यांनी त्यांच्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह माडखोल येथे भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली आणि गावातील वीज समस्या सोडवण्यासोबतच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिले. महावितरणच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि आश्वासनामुळे ग्रामस्थांनी आजचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी माडखोल उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ, माडखोल गाव विकास संघटनेचे दत्ताराम राऊळ, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, बंटी सावंत, अविनाश राऊळ, दशरथ राऊळ, सहदेव राणे, संदेश राऊळ, कृष्णा राऊळ, आत्माराम राऊळ, अनंत राऊळ, प्रसाद राऊळ, रोहित राऊळ आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com