कलमठ ग्रामपंचायतीच्या नवोपक्रमांमुळे भारावलो
82389
कलमठ ग्रामपंचायतीच्या नवोपक्रमांमुळे भारावलो
विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी ः सरपंच मेस्त्री यांचा सत्कार
कणकवली, ता.५ : कलमठ ग्रामपंचायत म्हणजे आदर्श ग्रामपंचायत कशी असावी याचा वस्तुपाठ आहे, असे गौरवोद्गार कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. ग्रामपंचायतीच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, महिलांसाठीच्या सुविधा आणि नवोपक्रमांमुळे भारावून गेलो आहे. याठिकाणी भेट देऊन समाधान मिळाले, असेही त्यांनी नमूद केले. तसेच कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचा त्यांनी विशेष सत्कार केला.
डॉ. सूर्यवंशी यांनी महसूल दिनाच्या निमित्ताने कलमठ ग्रामपंचायतीला भेट दिली. या वेळी सत्यपान ॲपद्वारे हयात प्रमाणपत्रांचे वाटप, विविध दाखल्यांचे वितरण आणि ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांचे निरीक्षण केले. सरपंच संदीप मेस्त्री यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, मी कुठल्याही ग्रामपंचायतीत गेलो की, सर्वप्रथम कचऱ्याचे नियोजन विचारतो. ग्रामपंचायत जर कचऱ्यावर उपाययोजना करत नसेल, तर ती पंचायत इतर काही करू शकत नाही. कलमठ ग्रामपंचायतीने सुक्या आणि ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण, त्याचे संकलन, प्रक्रिया युनिट बसवणे, आणि घरोघरी कचरा गोळा करण्याची यंत्रणा उभी करून उत्तम कार्य केले आहे. याशिवाय गावातील प्रत्येक महिलेस दरमहा पाच सॅनिटरी पॅड मोफत देण्याचा उपक्रम ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे. ही बाब इतर गावांसाठीही प्रेरणादायक ठरावी, असे आयुक्तांनी सांगितले.
सरपंच संदीप मेस्त्री यांनी कलमठ गावाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेत प्रथम क्रमांक, ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन, शाळांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटर एटीएम यांसारख्या सुविधा, गावातील भूमिहीन कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्याचा उपक्रम, महाऑनलाईन ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून गावातच विविध प्रमाणपत्रांची व्यवस्था आदींबाबतची माहिती दिली. अप्पर आयुक्त डॉ. मानिक दिवे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी सरपंच महेश लाड, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.