३७ लाखांची दारु नेणारा कंटेनर पकडला
82405
करूळमध्ये ३७ लाखांची दारू पकडली
पोलिसांची कारवाई ः दिखाव्यासाठी कंटेनरमध्ये भरला लाकडी भुसा
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ ः येथील करूळ तपासणी नाक्यावर ३६ लाख ९६ हजार रुपयांची दारू वैभववाडी पोलिसांनी पकडली. दारूसह ५९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास करण्यात आली. कंटेनरमधून लाकडाचा भुसा वाहतुकीचा दिखावा करून ११०० बॉक्स दारू नेली जात होती. महिनाभरातील ही चौथी मोठी कारवाई आहे.
करूळ तपासणी नाक्यावर हवालदार रणजित सावंत, कॉन्स्टेबल समीर तांबे, कॉन्स्टेबल श्री. हाके कार्यरत होते. वाहनांची कसून तपासणी त्यांच्याकडून सुरू होती. दरम्यान, आज पहाटे पावणेसहाच्या सुमारास वैभववाडीहून गगनबावड्याच्या दिशेने जात असलेला कंटेनर (आरजे ५३, जीए ०५५२) हा करूळ तपासणी नाक्यावर आला. पोलिसांनी कंटेनर थांबविला. चालक नवीन सुरेश कुमार (वय २९, रा. कदम, ता. भिवानी, जि. भिवानी, रा. हरियाणा) याच्याकडे कंटेनरमधील मालाविषयी विचारणा केली असता त्याने बायोमास फ्युअल क्रिक्स असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पावतीची विचारणा केली असता तो संदर्भहीन बोलू लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा साहाय्यक वीरेंद्र भरत सिंग (४२, रा. हजमपूर, ता. हंसी, जि. हिसार, रा. हरियाणा) याच्याकडे विचारणा केली असता दोघांकडूनही समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कंटेनर उघडण्यास सांगितला. कंटेनर उघडला असता सुरुवातीला लाकडाचा भुसा भरलेल्या सफेद रंगाच्या पिशव्या दिसून आल्या. तरीदेखील पोलिसांनी काही पिशव्या बाजूला करून पाहिले असता कंटेनरमध्ये स्वतंत्र लोखंडाला प्लायवूड बसविलेला स्वतंत्र बॉक्स दिसून आला. तो उघडल्यानतंर पोलिस चक्रावून केले. पूर्ण कंटेनरमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. ही माहिती वैभववाडी पोलिस स्थानकात दिल्यानंतर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा साहाय्यक पोलिस निरीक्षक जी. जी. माने, कॉन्स्टेबल हरिष जायभाय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कंटेनर ठाण्यात आणला. कंटेनरमधील बॉक्सची मोजणी करण्यात आली. साधारणपणे दोन तास ही प्रकिया सुरू होती. कंटेनरमध्ये ११०० बॉक्स आढळले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बॉक्स होते. ही दारू ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीची असून कंटेनरसह ५९ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सर्वांत मोठी कारवाई
वैभववाडी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू वाहतुकीविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. संभाजी चौक, कुसूर, करूळ तपासणी येथे दारू पकडली होती. त्यानंतर आज चौथ्यांदा पोलिसांनी करूळ तपासणी नाक्यावर कारवाई केली आहे. वैभववाडी पोलिसांनी आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
बघ्यांची मोठी गर्दी
कंटेनरमध्ये बॉक्स बनवून सुरू असलेल्या दारू वाहतुकीचा पर्दापाश पोलिसांनी केल्याची माहिती शहरात चुटकीसरशी पसरली. त्यानंतर तो बॉक्स पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी पोलिस आवारात केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.