कविता ही भावना, विचारांची अभिव्यक्ती

कविता ही भावना, विचारांची अभिव्यक्ती

Published on

82510

कविता ही भावना, विचारांची अभिव्यक्ती

दीपक पटेकर ः मळगाव वाचनालयामध्ये ‘काव्यांजली’

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः कविता ही कवीच्या मनातील भावना आणि विचारांची अभिव्यक्ती असते. जी कविता मनातून येते, तिच्यात शब्दसौंदर्य असते आणि तीच श्रोत्यांच्या मनाला भावते, असे प्रतिपादन को.म.सा.प. सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा कवी दीपक पटेकर यांनी केले.
(कै.) प्रा. उदय खानोलकर वाचन मंदिर, मळगावच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘काव्यांजली’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कविता वाचन आणि गायनाचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर, माजी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, मळगाव इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मनोहर राऊळ, वाचन मंदिराचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मळगाव इंग्लिश स्कूलच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर स्वरचित कविता सादर केल्या. निसर्ग, पाऊस, श्रावणसरी, देशप्रेम, आई, सैनिक अशा अनेक विषयांवर या बालकवींनी सुंदर काव्यरचना सादर केल्या. एवढ्या लहान वयात प्रभावी कविता लिहिणाऱ्या आणि त्या व्यासपीठावर आत्मविश्वासाने सादर करणाऱ्या मुलांचे कवी पटेकर यांनी विशेष कौतुक केले.
प्रशालेच्या शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत भोसले, रितेश राऊळ, सुधा देवण, सौ. मौर्ये, नितीन वराडकर, कृतिका राणे आणि ऋतुजा जाधव यांनीही कविता सादर केल्या. दोडामार्ग येथील कवी रामचंद्र शिरोडकर यांनी मालवणी आणि मराठी कविता सादर केल्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली. गौरी डिचोलकर हिने विंदा करंदीकर यांची ‘असे जगावे’ ही कविता वाचून उपस्थितांना जगण्याची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवी पटेकर यांनी आपल्या दोन गझला सादर केल्या. त्यानंतर त्यांनी बालकवींना कविता कशी लिहावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कविता लिहिताना लय, ताल, प्रतिमा, रुपक, यमक आणि विपुल शब्दसंग्रह किती महत्त्वाचा आहे, हे त्यांनी सोप्या भाषेत सांगितले. ‘कवितांमध्ये क्लिष्ट आणि कठीण शब्दांऐवजी साधे, सोपे शब्द वापरावेत, कारण ते वाचकांच्या मनाला लगेच भिडतात’, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘वाचाल तर वाचाल’ या वाक्याची आठवण करून देत, कवी, लेखक होण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मळगाव इंग्लिश स्कूलमधून दहावीच्या परीक्षेतील प्रथम क्रमांक निधी राऊळ, द्वितीय राऊळ, तृतीय याहिका साटेलकर व चतुर्थ जान्हवी अमरे यांचा गौरव करण्यात आला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून इतिहास विषयात सुवर्णपदक मिळविलेल्या प्रसन्न सोनुर्लेकर याचाही ग्रंथभेट देऊन सन्मान केला. प्रा. सुभाष गोवेकर, मळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. फाले आदी उपस्थित होते. स्नेहा खानोलकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com