राजापुरात आढळली दुर्मिळ हंस तुरा

राजापुरात आढळली दुर्मिळ हंस तुरा

Published on

-rat६p६.jpg-
P२५N८२४७६
राजापूर ः तालुक्यातील पाणथळ जागेतील पाणवनस्पती, ज्याला हंसतुरा म्हणून ओळखले जाते.
- rat६p७.jpg-
२५N८२४७७
पाण्याच्यावर हंसाच्या चोचीसारखा भाग दिसत असल्याने त्याला हंसतुरा असे म्हटले जाते. (छाया : नेत्रा पालकर-आपटे, प्रतीक मोरे)

राजापूर तालुक्यामध्ये आढळली अतिदुर्मिळ ‘हंसतुरा’ प्रजाती
अतिशय मर्यादित जागेत अस्तित्व ; ऑगस्टदरम्यान फुलं, जैवविविधता टिकवण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी, एक अतिदुर्मिळ आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या रेडलिस्टमध्ये ‘अतिधोकाग्रस्त’ या वर्गवारीत असलेली ‘अपोनोजेटॉन नटेशी’ नावाची एक पाणवनस्पती आढळते. या वनस्पतीचे साताऱ्यात आढळणाऱ्या ‘वाय’ तुऱ्याशी जरी साधर्म्य आढळत असले तरी श्रीरंग यादव आणि अरूण चांदोरे यांनी केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासामुळे ही प्रजाती पूर्णपणे वेगळी असून, तिला हंसतुरा असेही म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी सल्लागार डॉ. एस. नटेश यांच्या नावावरून या वनस्पतीला ‘अपोनोजेटॉन नटेशी’ हे नाव दिले गेले. महाराष्ट्रात फक्त राजापूर पट्ट्यात ही प्रजाती अतिशय थोड्या जागेपुरती मर्यादित आहे. देशात फक्त तीन ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात याचा आढळ आहे आणि तेही अत्यंत थोड्या प्रमाणात. अत्यंत प्रदेशनिष्ठ असल्याने जर का या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन झाले नाही तर ही पूर्णपणे नष्ट होऊ शकते.
ही प्रजाती दोन ते अडीच मीटर खोल पाण्यातच वाढते. पाण्याखाली याचा कांदा वाढतो, पानेही पाण्यातच असतात. देठ दोन-एक मीटर वाढून पाण्याच्या वर याचा तुरा येतो, तो हंसपक्ष्याच्या चोचीसारखा दिसतो. त्यामुळे त्याला हंसतुरा म्हटले जाते. या तुऱ्यावर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात छोटी छोटी फुले येतात आणि मग फळे धरतात; मात्र या वनस्पतीचे परागीभवन कसे होते या विषयी अजूनही फारशी माहिती उपलब्ध नाही. सध्या हे तुरे, वापरून सोडून दिलेल्या खोल चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात वाढले आहेत. पावसाळा संपल्यावर त्यातील पाणी आटल्यावर जर का त्या खाणीच्या मालकांनी पुन्हा ती चिरेखाण वापरात आणायचा निर्णय घेतला तर तिथून ही वनस्पती पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका आहे.
---
कोट १
कातळसड्यांवर चाललेल्या भरमसाठ बांधकामांमुळे इतर प्रजातींवर त्या त्या प्रदेशातून नष्ट होण्याचे संकट उद्‌भवले आहे; मात्र या हंसतुऱ्याइतक्या दुर्मिळ प्रजातीवर असे संकट येऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील. रत्नागिरी जिल्हा हा जैवविविधतेच्या बाबतीत अत्यंत समृद्ध असा जिल्हा आहे. हे वैविध्य टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
- नेत्रा पालकर-आपटे, निसर्ग छायाचित्रकार व अभ्यासक
_
कोट २
एका तळ्यात अस्तित्वात असलेली आपले हातपाय दूरवर न पोचवू शकलेली आणि बहुतांश लोकांना हिची तोंड ओळखदेखील नाही, असा हा अनोखा हंसतुरा आहे. खोल पाण्यात वाढून पाण्यावर डोकावणारा पुष्पगुच्छ जवळून बघितला तर हंसाच्या मानेसारखा डौलदार दिसतो. सातारा वायतुऱ्याचा हा भाऊबंद. अतिशय दुर्मिळ, कधी कोणाच्या मनात आलं आणि या सोडलेल्या चिरेखाणीला भराव टाकून हॉटेल बांधावे की हंसतुऱ्याचा विषय संपलाच म्हणून कधी कधी वाटते वनस्पतींना पाय असते तर त्याही पळून गेल्या असत्या दूरवर.
- प्रतीक मोरे, निसर्ग अभ्यासक
---
दृष्टिक्षेपात...
* महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातच आढळ
* संवर्धनासाठी प्रयत्न हवेत
* दोन ते अडीच मीटर खोल पाण्यात वाढ
* पाण्याखाली कांदी वाढते, पानेही पाण्यातच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com