निधी नाही मग, सिंधुदुर्ग खड्डेमुक्त होणार कसा?
82750
निधी नाही मग, सिंधुदुर्ग खड्डेमुक्त होणार कसा?
परशुराम उपरकरः अनैतिक धंद्यांना सत्ताधाऱ्यांचे अभय
कणकवली, ता.७ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार, ड्रग्ज, गांजा आणि अवैध दारू विक्री जोरात सुरू असून या सर्व अनैतिक धंद्यांना सत्ताधाऱ्यांचे अभय आहे, असा आरोप माजी आमदार आणि शिवसेना नेते परशुराम उपरकर यांनी आज केला. सिंधुदुर्गातील सर्व रस्त्यांची अवस्था खड्डेमय आहे. पण जिल्ह्यातील ठेकेदारांचे पाचशे कोटी रूपये देण्यासाठी शासनाकडे निधीच नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात खड्ड्यांची समस्याही जैसे थे राहणार असल्याची टीकाही त्यांनी केली.
येथील संपर्क कार्यालयात श्री. उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सिंधुदुर्गात फक्त काही दिवसापुरताच मटका, जुगार बंद झाला. पण आता खुद्द सत्ताधाऱ्यांच्याच आशीर्वादामुळे सर्व अवैध धंदे खुलेआम सुरू झाले आहेत. गांजाही उपलब्ध होऊ लागला आहे. तर पोलीस प्रशासनाकडून केवळ नावापुरतीच कारवाई केल्याचे दाखवले जात आहे.
ते म्हणाले, सिंधुदुर्गातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण जिल्ह्यातील ठेकेदारांची पाचशे कोटींची येणे अद्याप बाकी आहे. जर ठेकेदारांना निधीच मिळणार नसेल तर जिल्ह्यातील खड्डे कसे बुजवले जाणार? खड्डे बुजविण्याची घोषणा करून इथले राज्यकर्ते जनतेची दिशाभूल करत आहेत.
श्री. उपरकर यांनी शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेली दोन वर्षे रेशन ग्राहकांना आनंदाचा शिधा दिला जात होता. मात्र यंदा हा शिधा मिळणार की नाही? असा प्रश्न आहे. लाकडी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी बाद केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर लाकडी बहीण, आनंदाचा शिधा या योजनाही बंद करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे.
ते पुढे म्हणाले, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची स्थिती अत्यंत खराब आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पेवर ब्लॉक टाकून खड्डे बुजवले जात आहेत. मात्र खड्ड्यांची समस्या कायम आहे. त्याचा गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. गेले पंधरा वर्षे महामार्ग पूर्णत्वास जात नाही ही खरी शोकांतिका आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या स्थितीवरही श्री. उपरकर यांनी नाराजी व्यक्त केली.
कोट
जिल्हा रूग्णालयात ८७ डॉक्टरांची भरती झाल्याचे पालकमंत्री नितेश राणे सांगत आहेत. मात्र यातील बहुतांश डॉक्टर हे शिकाऊ असून त्यांच्यावर जनतेचा जीव सोपवावा का, हा प्रश्नच आहे. कोकण रेल्वे कोलाडपासून कार रो रो सेवा सुरू करणार आहे. मात्र त्याचा चाकरमान्यांना फारसा उपयोग होणार नाही. दुसरीकडे मुंबई ते विजयदुर्गपर्यंत जल वाहतुकीची रो रो सेवा सुरू होणार आहे. मात्र या दोन्ही सेवांचा फायदा फक्त ठराविक लोकांनाच होणार आहे. सर्वसामान्य कोकणवासीयांना हालअपेष्टा सहन करतच गाव गाठावे लागणार आहे.
- परशुराम उपरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.