त्वचेला त्रास देणारी बुरशी अन् बरेच काही......
लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(१ ऑगस्ट टुडे ४)
पावसाळा आला की, मौजमजा व पावसात भिजणे हे आलेच तसेच पावसात थैमान घालतात ते म्हणजे वेगवेगळे साथीचे आजार. पाण्यातून प्रसार होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते तसेच काही त्वचेच्या आजारांचेही प्रमाणही या दमट वातावरणात वाढते. त्यातील एक म्हणजे नायटा किंवा बुरशी संसर्ग. याबाबत जाणून घेऊया...!
P25N82773
- डॉ. बिपिन दाभोळकर, चिपळूण
---
त्वचेला त्रास देणारी
बुरशी अन् बरेच काही......
नायटा कोणत्याही वयोगटात होतो; परंतु काम करणाऱ्या व्यक्ती, खूप घाम येणाऱ्या व्यक्ती तसेच ओलाव्यात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण जास्त आढळते. उदाहरणार्थ, वाहनचालक, उन्हात व इतर दमट ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती तसेच जर शरीराची प्रतिकारशक्ती कमी असेल तरीही नायटा होण्याचे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ, मधुमेह, दीर्घ आजार यांसह अस्वच्छता हेही एक कारण आहे.
वसतीगृहात राहणारे विद्यार्थी तसेच आश्रमात राहणारे. किशोरवयीन मुले-मुली कधीकधी आजार लपवतात व पालकांना त्याची लवकर जाण होत नाही. अति जास्त स्थूलपणामुळे त्वचेच्या घड्या पडतात व त्यात ओलावा राहल्यामुळे सहज बुरशीची लागण होते.
धावती जीवनशैली, आजाराबद्दल अज्ञान, स्वतः घेतलेले, अपूर्ण व चुकीचे उपचार तसेच पाण्याचे प्रदूषण, हवामानातील बदल इ. मुळे नायट्याचे प्रमाण वाढत आहे. कधी अंगावर किंवा अवघड जागी एखादी पुळी येते व खाज येते. आपण दुर्लक्ष केल्यास ती एखाद्या किड्याप्रमाणे(warm) रेंगाळते व घेर घेऊन वर्तुळाकार (Ring) घेते म्हणून त्याला (Ringwarm) असे म्हणतात तसेच कधी जांघेत हत्तीच्या कानासारखी दिसते म्हणून मराठीत तिला गजकर्ण म्हणतात. इंग्रजीत फंगल इन्फेक्शन म्हणातात. कधी रुग्ण स्वतः स्टेरॉइडची औषधे लावतात तेव्हा हा आजार ओळखू येत नाही लहान मुलांना डोक्यात ओला नायटा किंवा सुका नायटा होतो. नायट्यासारखे दिसणारे इतर आजार सोरायसिस, कृष्ठरोग इत्यादी आहेत. या आजारांची उपचारपद्धती वेगळी असते त्यांचे योग्य निदान त्वचारोग तज्ज्ञच करू शकतात म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. अशा आजारात उपचारात काही अडचणी उभ्या राहतात. या आजारांचे उपचार सोपे असले तरी बऱ्याचदा उपचारांमध्ये अडचणी येतात व आजार पूर्ण बरा होत नाही. वाढत्या धकाधकीच्या जीवनामुळे व बैठ्या कामामुळे रुग्णांमधील स्थूलपणा तसेच अतिघामामुळे रुग्ण लवकर बरे होत नाहीत. काही लोकांच्या व्यवसायात सेफ्टी शूज, जाड कपडे, खूप बंद कपडे घालावे लागतात तसेच धार्मिक कारणामुळे बंद कपडे घातल्याने आजार लवकर बरा होत नाही. कधी कधी शारीरिक रचना, व्यवसाय, डायबेटिससारखे इत्यादी आजार, जीवनशैली, खर्चिक औषधे व अपूर्ण उपचार इत्यादी गोष्टी उपचारात बाधा आणतात.
आजार पुन्हा होण्याची इतर कारणे
१) अपूर्ण उपचार -लवकर बरे वाटले की, रुग्ण उपचार सोडून देतात व काही दिवसांनी आजार परत झाला असे त्यांना वाटते. आजाराची लक्षणे कमी होणे व आजार बरा होणे यात ४-६ आठवड्यांचे अंतर असल्याने असे होते.
२) आजार पूर्ण बरा झाल्यानंतर ही पुन्हा नव्याने संसर्ग होणे.
३) संसर्ग झाल्याने औषधे काम कमी करतात.
४) केमिस्टकडून स्वतःच रुग्ण स्टेरॉईड असणारी औषधे लावतात त्याने आजार कमी झाल्याचा भास होतो व औषधे बंद केल्यास ५-६ दिवसात परत पहिल्यापेक्षा जास्त आजार वाढतो म्हणून रुग्ण पुन्हा पुन्हा तेच औषध लावत राहतो. याला स्टेरॉईड डिपेन्डन्स म्हणतात व याने बुरशीची ताकद वाढते. अशा बुरशीचा दुसऱ्या रुग्णाला संसर्ग झाल्यास त्याला उपचार सुरुवातीपासूनच काम कमी करतात.
उपचारांची गुंतागुंत
नायट्याची काही औषधे ही इतर मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच चरबी कमी करणाऱ्या औषधांबरोबर काळजीने द्यावी लागतात. बुरशीनाशक औषधे यकृतावर परिणाम करतात म्हणून तीही मद्यपान करणारा किंवा काविळ व इतर यकृतांच्या आजारातील रुग्णांना सावधगिरीने द्यावी लागतात. स्वतः स्टेरॉइडने उपचार केल्याने आजारावर उपचार करणे कठीण होते म्हणून रुग्णांनी घरगुती व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावेत. उपचारांमध्ये बुरशीमारक गोळ्या व मलम तसेच साबण, पावडर इत्यादींचा वापर ४-६ आठवड्यांसाठी करावा लागतो. योग्य औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास हा आजार ४-६ आठवड्यात नक्की बरा होऊ शकतो.
(लेखक चिपळुणातील प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञआहेत.)
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.